लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांचे गाणे हे चिरकालीन आहे. संगीतातील कालचक्रावर त्यांच्या अद्वितीय गायकीची मुद्रा उमटलेली आहे. त्याचा गोडवा कधीच कमी होणार नाही. पुढच्या पिढीला आम्ही अभिमानाने सांगू की ‘आम्ही भीमसेन ऐकला’... अशा शब्दांत विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी पंडितजींना भावांजली वाहिली.
बालगंधर्व रंगमंदिर येथे संवाद, पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ बुधवारी (दि.३) केला. यावेळी पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर ४० वर्षे साथसंगत करणारे ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कार डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पंडितजींचे चिरंजीव श्रीनिवास जोशी, नातू विराज जोशी, गायक पं. उपेंद्र भट, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, किराणा घराण्यातील गायिका मीना फातर्पेकर, गायिका सानिया पाटणकर, समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष राजेश पांडे, संवाद, पुणेचे प्रमुख सुनील महाजन, संवाद, पुणेच्या निकिता मोघे उपस्थित होते.
डॉ. अभ्यंकर म्हणाले, राष्ट्राने जगाला अध्यात्म आणि अभिजात संगीत या दोन मोठ्या देणग्या दिल्या. आज गायनाच्या क्षेत्रात अनेक घराणी आहेत. मात्र अण्णांनी किराणा घराण्याचा ध्वज ज्या एका उंचीवर नेऊन फडकावला आहे, त्याला तोड नाही. सर्व घराण्यांचा एकत्रित अनुभव अण्णा त्यांच्या सादरीकरणातून परिपूर्ण पद्धतीने द्यायचे. गुरूंकडून शिकणे ही विद्या असते आणि त्याचे सादरीकरण करणे ही कला असते. अण्णा हे देवदत्त होते. अनेक दशके अण्णांनी रसिकांनी ब्रह्मानंद दिला.
‘स्वरभास्कर’ हे अण्णांचे संपूर्ण चरित्र डॉ. शंकर अभ्यंकर यांनी शब्दबद्ध केले आहे. पुस्तकाचे लेखन पूर्ण झाल्यानंतर तब्बल आठ महिने अण्णांच्या घरी त्याचे वाचन होत होते. एकदा पहाटेच्या वेळी त्यांचा गाण्याचा मस्त मूड लागल्याने त्यांनी मला ‘भटियार’ ऐकवला होता. त्या स्वरांवरची जबरदस्त हुकूमत त्या वेळी अनुभवायला मिळाली असल्याची आठवण डॉ. अभ्यंकर यांनी सांगितली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘कानन दरस करो’ या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी यांनी पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि संगीताच्या विविध पैलूंवर रचलेल्या रचनांचे सादरीकरण केले.
समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले.