आमच्या वाट्याला आलंय पशूंच जिणं
By Admin | Updated: May 23, 2016 01:49 IST2016-05-23T01:49:22+5:302016-05-23T01:49:22+5:30
घराला चारही बाजूंनी पत्रे, हवा येण्यास जागा नाही. बाहेर तळपते ऊन, पत्र्याच्या घरात असह्य होणारा उकाडा अशा स्थितीत घराबाहेर थांबून दिवस काढता येतो.

आमच्या वाट्याला आलंय पशूंच जिणं
पिंपरी : घराला चारही बाजूंनी पत्रे, हवा येण्यास जागा नाही. बाहेर तळपते ऊन, पत्र्याच्या घरात असह्य होणारा उकाडा अशा स्थितीत घराबाहेर थांबून दिवस काढता येतो. परंतु, तापलेल्या पत्र्याखाली रात्री घरात थांबणे कठीण होते.
नदीकाठचा परिसर असल्याने डासांचा उपद्रव सहन करावा लागतो. वीज नसल्याने डासांच्या त्रासापासून मुक्ततेसाठी केले जाणारे उपाय तोकडे पडतात. ‘आम्हीसुद्धा माणसं आहोत’ हे टाहो फोडून सांगण्याची वेळ आता पिंपरी, मिलिंदनगर येथील पत्राशेडच्या रहिवाशांवर आली आहे.
परिसरात एक बालक फाटक्या साडीने तयार केलेल्या झोक्यात झोके घेत होते. झोके कसले, घरात गुदमरते म्हणून ते मोकळ्या हवेत आले होते. सिंधू काळे ही वृद्ध महिला घराच्या दारात बसली होती.
अगोदरच आजारी, त्यात खुराड्यात राहिल्यासारखे पत्र्याच्या घरात कोंडून आजारपण वाढू शकते. यामुळे घराच्या दारात बसल्याचे कारण त्या महिलने सांगितले. त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या कविता साबळे यांनीही अशीच व्यथा मांडली. चांगल्या इमारतीत राहणाऱ्यांना कुलर, पंखा वापरून उन्हाळ्याचा त्रास कमी करता येतो. परंतु, येथे वीजच नसल्याने उपकरणांचा वापर करता येत नाही.
पत्राशेडमधील अन्य रहिवाशांना महापालिकेच्या पुनर्वसन प्रकल्पातील घरांमध्ये स्थलांतरित केले. आता केवळ ५० कुटुंबे उरली आहेत. त्यांच्या वाट्याला अत्यंत वाईट जीवन आले आहे. नदीकाठचा हा परिसर एकीकडे उकाड्याचा त्रास, तर दुसरीकडे डासांचा उपद्रव एकेक दिवस शिक्षा भोगल्याचा अनुभव येथील रहिवाशांना येत आहे, असे शकुंतला चव्हाण या महिलेने नमूद केले. (प्रतिनिधी)दिशाभूल, गैरसमज
मिलिंदनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना काही पुढाऱ्यांनी दोन घरे देण्याचे आश्वासन दिले होते. वास्तविक पाहता महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जे पात्र ठरले, त्यांनाच पुनर्वसन प्रकल्पातील घरांचे वितरण करण्यात आले आहे. परंतु, येथील रहिवाशांमध्ये पुढाऱ्यांच्या आश्वासनांमुळे गैरसमज पसरला आहे. आपणास दोन घरे मिळू शकतील ही आशा बाळगून रहिवाशी मिलिंदनगरची जागा सोडत नाहीत. ज्यांनी आश्वासन दिले, त्यांनी रहिवाशांची दिशाभूल केली आहे. त्यांच्यात गैरसमज पसरवला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशी आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, आता थोड्याच संख्येने कुटुंब पत्राशेडमध्ये राहत आहेत. त्यामुळे या कमी संख्येने राहणाऱ्या कुटुंबांना दोन घरे देण्यास महापालिकेला अडचण येणार नाही, अशी त्यांनी मनाची समजूत करून घेतली आहे. त्यामुळे हाल अपेष्टा सहन करून ते जीवन कंठीत आहेत.पत्राशेडमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना गतवर्षी आॅगस्टमध्येच पुनर्वसन प्रकल्पातील घरांचा ताबा देण्याची तयारी महापालिकेने केली. लाभार्थींचा स्वहिस्सा भरून त्यांनी ताबा घ्यावा, अशा सूचना दिल्या. ज्यांना ५० हजारांपर्यंतच्या रकमेचा स्वहिस्सा रक्कम भरण्यास अडचणी आहेत, त्यांना कर्ज स्वरूपात ही रक्कम उपलब्ध करून देण्यास महापालिका तयार आहे. खुल्या वर्गातील रहिवाशांसाठी ५१ हजार, तर मागासवर्गीयांसाठी ४२ हजार रुपये स्वहिस्सा रक्कम निश्चित केली आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. जागा सोडण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे हालअपेष्टा सहन करत ते त्या ठिकाणी राहत आहेत.
- मिनीनाथ दंडवते
सहायक आयुक्त,
झोपडपट्टी पुनर्वसन विभाग