विकासासाठी आम्ही भाजपात
By Admin | Updated: January 10, 2017 03:20 IST2017-01-10T03:20:00+5:302017-01-10T03:20:00+5:30
आम्ही एकत्रित असताना, शहराचा विकास साधला. विकासाला खीळ बसू नये, अशी आपली भूमिका आहे, विकासाला खीळ बसणार नाही

विकासासाठी आम्ही भाजपात
पिंपरी : आम्ही एकत्रित असताना, शहराचा विकास साधला. विकासाला खीळ बसू नये, अशी आपली भूमिका आहे, विकासाला खीळ बसणार नाही, हा विश्वास भाजपात कार्यरत असलेल्या आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी तसेच भाजपाच्या नेत्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी महापौर आझम पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पानसरे म्हणाले, ‘‘आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार विलास लांडे तसेच आमदार महेश लांडगे आम्ही सर्वांनी एकत्रित काम केले आहे. १९८६ पासून एकत्र होतो. शहराचा विकास करताना कधी भेदभाव केला नाही. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले आहे. भाजपामध्ये राजकीय कारकिर्द नव्याने सुरू करणार आहे.’’
शहर विकासात खीळ बसता कामा नये, ही भूमिका आहे. आणखी चांगल्या पद्धतीने विकासकामे करण्याचा विश्वास भाजपने दिला आहे. भाजपातील पदाधिकाऱ्यांशी पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे मला वेगळे वाटत नाही. यापूर्वी एकदा उद्विग्न होऊन राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा प्रसंग ओढवला होता, त्या वेळी जवळचे कार्यकर्ते, सहकारी यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी भाजपात प्रवेश करताना कोणाचा कौल घेतला? या प्रश्नाला उत्तर देताना तेम्हणाले, या वेळी जुन्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला.
या पत्रकार परिषदेस खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, बाबू नायर, प्रमोद निसळ, कुलकर्णी, राजेश पिल्ले, सदाशिव खाडे, उमा खापरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पानसरे यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल खासदार साबळे म्हणाले, ‘‘पानसरे यांच्या आगमनामुळे भाजपाला फायदा होणार आहे. त्यांच्यामुळे निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांनाही पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल.’’
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘गतकाळात आमच्याकडून काही चुका झाल्या, त्या दुरुस्त करण्याची ही वेळ आहे, असे समजून एकत्र आलो आहोत. झाले गेले विसरून जाऊन आझम पानसरे यांना भाजपात सामावून घेतले आहे. तेसुद्धा आमच्याबरोबर मुंबईत असतील, असा प्रयत्न राहील. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना शब्द दिला आहे.’’ आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘पानसरे हे माझ्यासाठी राजकीय गुरू आहेत. गुरूंचे पुनर्वसन व्हावे, ही मनोमन इच्छा आहे.’’