चर्चेस आम्हीही तयार...
By Admin | Updated: February 10, 2017 02:55 IST2017-02-10T02:55:38+5:302017-02-10T02:55:38+5:30
चिटणीस बखरीत काल्पनिक इतिहास लिहिला असून, गडकरींचे समर्थन करणाऱ्या कलाकारांनी तत्कालीन पुरावे घेऊन यावेत, आम्ही चर्चेसाठी कधीही तयार आहोत

चर्चेस आम्हीही तयार...
पुणे : चिटणीस बखरीत काल्पनिक इतिहास लिहिला असून, गडकरींचे समर्थन करणाऱ्या कलाकारांनी तत्कालीन पुरावे घेऊन यावेत, आम्ही चर्चेसाठी कधीही तयार आहोत, असे जाहीर आवाहन करणाऱ्या माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचे हे निमंत्रण अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने खुल्या दिलाने स्वीकारले आहे. त्यांना परिषदेतर्फे पत्र पाठवून तारीख आणि वेळ ठरविली जाणार असून, हा कलगीतुरा पुण्यातच रंगण्याची शक्यता आहे.
‘राजसंन्यास’ या पुस्तकात थोर नाटककार राम गणेश गडकरी यांनी छत्रपती संभाजीराजांची बदनामी केल्याप्रकरणी संभाजी उद्यानातील गडकरी यांचा पुतळा फोडण्यात आला, त्याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले, साहित्य संमेलनातही गडकरी पुतळा फोडण्याच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. नाट्य परिषदेच्या मध्यवती शाखेसह कोथरूड व पुण्याच्या शाखेने याचा निषेध नोंदविण्यासाठी एक बैठक पुण्यात आयोजिली होती. जोपर्यंत गडकरी यांचा पुतळा उद्यानात बसविला जात नाही तोपर्यंत ही आंदोलनाची चळवळ सुरूच राहाणार असल्याचा एल्गार या बैठकीत केला. दरम्यान, गडकरींनी राजसंन्यास नाटकात केलेली बदनामी ही इतिहासाच्या आधारे केली आहे, असे भासवले जात आहे. त्यासाठी चिटणीस बखरीचा पुरावा दिला जात आहे. (प्रतिनिधी)