आम्ही सारे दाभोलकर..
By Admin | Updated: August 21, 2015 02:28 IST2015-08-21T02:28:05+5:302015-08-21T02:28:05+5:30
आम्हाला धीर देणारा, शांतताप्रिय माणूस त्यांना डेंजर वाटला कसा? विचारांच्या निर्मळ झऱ्याला निर्सगवादी मृत्यू आला नाही, तर त्यांचा खून झाला आहे.

आम्ही सारे दाभोलकर..
पुणे : आम्हाला धीर देणारा, शांतताप्रिय माणूस त्यांना डेंजर वाटला कसा? विचारांच्या निर्मळ झऱ्याला निर्सगवादी मृत्यू आला नाही, तर त्यांचा खून झाला आहे. ते आपल्यामध्ये नाहीत, यावर विश्वासही बसत नाही. ते आपल्यामध्ये जिंवत आहेत... त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत, हे सांगतानाच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा कंठ दाटून आला अन् तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. उपस्थितांचे डोळेही पाणावले.
डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गुरुवारी ‘तिमिराकडून तेजाकडे’ या पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन करण्यात आले. अभिनेते किशोर कदम, गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी अभिवाचन केले. सोनाली कुलकर्णीने २०१३मध्ये प्रसिद्ध झालेला ‘घात झाला’ हा लेख वाचून दाखवला. या वेळी सोनाली म्हणाली, ‘‘दाभोलकरांनी कधीच किस्से सांगून रमवलं नाही. पोपटपंची करू नका, असा सल्ला ते कार्यकर्त्यांना देत.’’ दाभोलकरांसमवेत केलेल्या दौऱ्यांच्या आठवणी तिने सांगितल्या.
नागराज मंजुळे म्हणाले, ‘‘जातपंचायत नष्ट होणे आवश्यक आहे. ज्या लोकांनी दाभोलकर आणि पानसरे यांचा खून केला आहे, त्यांची विचारधार स्पष्ट दिसत आहे. त्या लोकांचा पराभव आपण आपल्या विचारांनी करू शकतो.’’
किशोर कदम म्हणाले, ‘‘दाभोलकर आणि पानसरेंना गोळ्या घालून अंधश्रद्धा निर्मूलनाची आणि समतेची चळवळ थांबली नाही. उलट, त्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून ती दुप्पट जोमाने पुढे चालली आहे. या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे यात तरुणाईचा सहभाग जास्त आहे. नागरी समाज जागृत होत आहे आणि आजच्या तरुणाईला आजूबाजूला काय चालू आहे, याची जाणीव आहे. तरुणाईच्या सहभागामुळे ही चळवळ अजून तीव्र होणार आहे.’’
दिर्ग्दशक अतुल पेठे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)