पाणी मिळणार २४ तास, मात्र पाणीपट्टीत मोठी वाढ
By Admin | Updated: January 18, 2016 01:23 IST2016-01-18T01:23:18+5:302016-01-18T01:23:18+5:30
शहराला २४ तास मीटरने पाणी पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे.

पाणी मिळणार २४ तास, मात्र पाणीपट्टीत मोठी वाढ
पुणे : शहराला २४ तास मीटरने पाणी पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. त्याकरिता दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी पाणीपटट्ीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला आहे. या प्रस्तावाला मुख्यसभेने पाठिंबा द्यावा याकरिता आयुक्तांनी जपानच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी सर्व पक्षीय नगरसेवकांच्या बैठका घेऊन त्यांना योजनेची आवश्यकता स्पष्ट केली आहे.
शहराची भौगोलिक रचना बशीसारखी असल्याने, तसेच शहरातील वितरण व्यवस्था अतिशय जुनी असल्याने शहराला असमान पाणीपुरवठ्याला तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेमधील अस्तित्वातील जलशुद्धीकरण केंद्रे, पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था इत्यादींचा अभ्यास करून शहराला एकसमान २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे.
शहराची २०४७ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून ही योजना आखण्यात आली आहे. त्या वेळी शहराची लोकसंख्या ७३ लाख ७५ हजार असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. सध्याच्या साठवण टाक्यांची क्षमता कमी असणे, वितरण व्यवस्था योग्य नसणे, पाणीपुरवठ्याचा कालावधी व प्रेशर यामध्ये तफावत असणे, जुन्या वितरण नलिकांमधील लिकेजस त्यामुळे मोठयाप्रमाणात वाया जाणारे पाणी या प्रमुख त्रुटी आढळून आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या ७ जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. नवीन ४ जलशुद्धीकरण केंद्रांचे काम प्रगतिपथावर आहे. शहराचे १४१ पाणीपुरवठा विभाग व ३२८ उपविभाग पाडण्यात आले आहेत. नवीन पाणीपुरवठा विभागाप्रमाणे वितरण व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात आली आहे. सध्याच्या वितरण नलिकांमधील जुन्या व कमी व्यासाच्या नलिका बदलण्यात येणार आहेत. नवीन वितरण व्यवस्थेमुळे प्रत्येक विभाग व उपविभागास योग्य व पुरेशा दाबानुसार पाणीपुरवठा केला जाईल. अस्तित्त्वातील जलवाहिन्यांचे नेटवर्क मॉडेलिंग करण्यात आलेले आहे. याकरिता दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.