भुलेश्वर : गेल्या पाच वर्षांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पिंपरी गावात गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोदार पावसामुळे पिंपरी गावाच्या ओढ्याला पूर आला आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाईशी सामना करीत असलेल्या पिंपरी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे.पिंपरी गावच्या सरपंच मीना शेंडकर यांनी जलपूजन केले. पूर्वी नाझरे धरणावरून पिंपरी, पांडेश्वर, जवळार्जुन, नाझरे या चार गावांत मिळून नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आली. काही वर्षे ही योजना सुरळीत चालली. मात्र, या योजनेला ग्रहण लागल्याने ही योजना बंद झाली.बाकीच्या गावांनी स्वतंत्र पाणी योजना केली. मात्र, पिंपरी गावाला आजही स्वतंत्र पाणी योजना नाही. यासाठी एक कोटी ५ लाख रुपये किमतीचा नवीन आराखडा तयार करून शासनाकडे पाठवला आहे. मात्र अजूनही ही योजना प्रलंबित आहे. यामुळे पिंपरी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. येथील सरपंच मीना शेंडकर, उपसरपंच विजय थेऊरकर व ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मिळावा व पिंपरी गावाला कायमस्वरूपी स्वतंत्र पाणी योजना करण्यात यावी या मागणीसाठी पुरंदर तालुका पंचायत समिती व तहसील कार्यालय यांच्यावर हंडामोर्चा नेऊनआंदोलन केले. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. गुरुवारी रात्री पिंपरी गावामध्ये जोरदार पाऊस झाल्याने अनेक बंधारे भरले. यामुळे सध्या तरी पिंपरी गावचा पाणीटंचाईचा प्रश्न कमी होणार आहे. या बंधाºयातील जलपूजन पिंपरी गावच्या सरपंच मीना शेंडकर, उपसरपंच विजय थेऊरकर यांनी केले. या वेळी कृषिभूषण महादेव शेंडकर, दिलीप हंबीर, अशोक लिंबोरे, विठ्ठल शेंडकर, संपत शेंडकर, सुरेखा शेंडकर, शीतल चव्हाण, सुजाता थेऊरकर, संध्या चव्हाण, कल्पना शेंडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
पिंपरीच्या ओढ्याला ५ वर्षांनंतर आले पाणी, पाणीप्रश्न मिटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:27 IST