गावागावांत पाणीतंटे

By Admin | Updated: January 15, 2016 04:03 IST2016-01-15T04:03:49+5:302016-01-15T04:03:49+5:30

दौंड तालुक्यातील माटोबा तलावात पाणी असूनही पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी परिसरातील सुमारे १४ गावांना टंचाईच्या झळा बसत आहेत. यामुळे पाण्यासाठी ‘तू तू मै मै’

Water in the village | गावागावांत पाणीतंटे

गावागावांत पाणीतंटे

यवत : दौंड तालुक्यातील माटोबा तलावात पाणी असूनही पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी परिसरातील सुमारे १४ गावांना टंचाईच्या झळा बसत आहेत. यामुळे पाण्यासाठी ‘तू तू मै मै’ सुरू झाली आहे. गुरूवारी यवत व उंडवडी व लडकतवाडी ग्रामपंचायतीत सुरू असलेला वाद अखेर मिटला.
नाथाची वाडी येथील माटोबा तलावावरून परिसरातील १३ ते १४ गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. पाणीपुरवठा योजनांमध्ये काही ग्रामपंचायतींनी तलावालगत बंधारे बांधून त्यालगत विहीरी घेवून पाणी योजना केल्या आहेत. काही ग्रामपंचायतींनी थेट तलावातील पाणी उचलून त्याचे शुद्धीकरण करून पाणीपुरवठा योजना केल्या आहेत. सद्य परिस्थितीत तलावाच्या बाजूला विहीर घेऊन पाणीपुरवठा योजना केलेल्या ग्रामपंचायतींच्या योजना अडचणीत आल्या आहेत. बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाची पाणीपट्टीदेखील काही ग्रामपंचायतींनी भरली आहे. मात्र, वेळेत पाणी सोडले जात नसल्याने ग्रामपंचायतींच्या कारभारी मंडळींमध्ये वाद होऊ लागले आहेत.
असाच वाद यवत व उंडवडी व लडकतवाडी ग्रामपंचायतीत होता. यवत ही सर्वाधिक जास्त लोकसंख्येची ग्रामपंचायत आहे. सुमारे २० हजार लोकसंख्या गावात आहे. यवत गावाची माटोबा तलाव येथील पाणीपुरवठा विहीर तलावापासून काही अंतरावर असून, त्याअगोदर उंडवडी व लडकतवाडी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरी आहेत. यवत गावाच्या पाणीपुरवठा विहिरीलगत असलेल्या बंधाऱ्यात पाणी येत नाही. उंडवडी व लडकतवाडी गावांच्या विहिरीजवळ बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवून ठेवले जात असल्याने वाद निर्माण झाला होता. आज अखेर सर्व गावकारभारी व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तोडगा काढण्यात आला.
यवत गावाच्या विहिरीत पाणी यावे, यासाठी माटोबा तलावालगत असलेल्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी गावातील पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, यवतचे उपसरपंच सुभाष यादव, माजी सरपंच दशरथ खुटवड, ग्रामविकास अधिकारी संपत वाबळे, दौड तालुका भारिपा-बहुजन संघाचे अध्यक्ष उत्तम गायकवाड, माजी उपसरपंच सदानंद दोरगे, लालू जांबले, बाबासाहेब दोरगे, बाळासाहेब सापळे, धुळा भिसे आदी जेसीबी मशीन घेऊन तेथे पोहोचले.
या वेळी लडकतवाडीचे सरपंच संदीप लडकत, उंडवडी गावाच्या सरपंच रोहिणी पांढरे, माजी पंचायत समिती सदस्य उद्धव फुले, माजी सरपंच मुरलीधर भोसले व ग्रामस्थांनी उंडवडी व लडकतवाडी गावांच्या बंधाऱ्यात पाणी ठेवा आणि यवत गावाच्या बंधारादेखील भरून घ्या, अशी मागणी केली. याला यवत ग्रामस्थांनी सहमती दर्शविली. यानंतर यवत गावाच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ असलेल्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले.

यवतसाठी ठोस उपाययोजना गरजेची...
यवत गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दौंड-पुणे लोकल सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर गावाचा परिसर पुणे शहराचे उपनगर म्हणून विकसित होऊ पाहत आहे. यामुळे भविष्यातील पाणी समस्या विचारात घेता. आतापासूनच आणखी पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे बनत चालले आहे.

माटोबा तलावातील पाण्याचे नियोजन गरजेचे...
नाथाची वाडी येथे असलेला ब्रिटिशकालीन माटोबा तलाव परिसरातील अनेक गावांसाठी वरदान ठरत आहे. मात्र, सद्य परिस्थितीत तलावात पिण्यासाठी पाण्याचा मुबलक साठा असूनदेखील योग्य नियोजन नसल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यासाठी तलावातील पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Water in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.