वीजपंप बिघडल्याने पाण्यासाठी भटकंती
By Admin | Updated: June 8, 2015 05:22 IST2015-06-08T05:22:44+5:302015-06-08T05:22:44+5:30
वीज पंपात बिघाड झाल्याने वडेश्वर आणि भाऊ परिसरातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शेतकरी बैलगाडीतून, तर वृद्ध महिला डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन पाणी आणतात.

वीजपंप बिघडल्याने पाण्यासाठी भटकंती
टाकवे बुद्रुक : वीज पंपात बिघाड झाल्याने वडेश्वर आणि भाऊ परिसरातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शेतकरी बैलगाडीतून, तर वृद्ध महिला डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन पाणी आणतात.
वडेश्वर, गभालेवाडी, मोरमारवाडी, लष्करवाडी, माऊ, दवणेवाडी या गावांना वडेश्वर ग्रामपंचायतीमार्फत नळ पाणीपुरवठा योजनेतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र मागील दहा दिवसांपासून वीज पंपात तांत्रिक बिघाड झाल्याने योजना बंद आहे. उन्हाने अंगाची प्रचंड लाही लाही होत असताना उन्हाचे चटके सोसत बाया बापडे ठोकळवाडी धरणातून पाणी वाहत आहेत. सुमारे एक ते आठ किलोमीटरपर्यंत पायपीट करीत बैलगाडी, दुचाकी, जीपमधून पिण्याचे पाणी आणले जात आहे. मशागतीच्या दिवसात अधिक वेळ पाणी आणण्यासाठी जात असल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होतो.
गावालगतच्या विहिरीवरील दूषित पाण्याचा वापर घरगुती आणि जनावरांसाठी केला जातो. पाण्यासाठीची भटकंती पाहून वीज पंपात झालेला तांत्रिक बिघाड दूर करावा, अशी मागणी महिलांकडून होत आहे.
दहा दिवसांपासून अख्खा गाव आणि वाड्या-वस्त्या पाण्यासाठी धरणावर जात आहेत. त्याच्या सोबतीला लोकप्रतिनिधींचे कुटुंबीय देखील आहेत. पाण्यासाठीची भटकंती लोकप्रतिनिधींच्या कानावर जात नाही का, असा सवाल अनेक महिलांनी केला. ग्रामपंचायतीच्या इतर दोन वाड्यांवर नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा सुरळीत आहे. मग इतर गावे आणि वाड्या-वस्त्या तहानलेल्या कशा असा प्रश्न वडीलधाऱ्यांनी मांडला. एरवी अग्रेसर असणारे लोकप्रतिनिधी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत एवढे उदासीन का? उन्हाच्या झळा सोसत पाण्यासाठी वणवण करणाऱ्यांची सुटका लवकर व्हावी, अशी मागणी या परिसरातील बाळू मोरमारे, बिबाबाई मोरमारे, बारकाबाई गभाले, रामदास खांडे, अंजना मोरमारे यांनी केली.
सरपंच संतोषी खांडभोर म्हणाल्या, ‘‘पाच वर्षांत पहिल्यांदाच तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची गैरसोय झाली. पंप दुरुस्तीसाठी पाठवला असून, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल. आदिवासी ग्रामपंचायत असल्याने दुसऱ्या पंपाची सोय नाही.’’ (वार्ताहर)