इंदापूरमध्ये ‘उजनी’चे पाणी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:39+5:302021-05-14T04:11:39+5:30

न्यायालयीन लढा देण्याचे संकेत न्यायालयीन लढा देण्याचे संकेत : शेतकऱ्यांची बैठकीत निर्णय शेटफळगढे : इंदापूरला उजनीचे पाणी देण्यास सोलापूरकरांनी ...

The water of 'Ujani' will be lit in Indapur | इंदापूरमध्ये ‘उजनी’चे पाणी पेटणार

इंदापूरमध्ये ‘उजनी’चे पाणी पेटणार

न्यायालयीन लढा देण्याचे संकेत

न्यायालयीन लढा देण्याचे संकेत : शेतकऱ्यांची बैठकीत निर्णय

शेटफळगढे : इंदापूरला उजनीचे पाणी देण्यास सोलापूरकरांनी विरोध केल्यानंतर आता उजनीचे पाणी चांगलेच पेटणार असल्याचे संकेत आहेत. उजनीच्या हक्काच्या पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी वेळप्रसंगी न्यायालयीन लढा देण्याची तयारी केली आहे. याबाबत शेटफळगढे येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या वेळी पार पडलेल्या बैठकीत उजनीच्या हक्काच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी ठेवण्याचे अवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी केले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी राजकारण विसरून शेतकरी या नात्याने एकत्रित लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनदेखील पाटील यांनी केले आहे. उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलून ते शेटफळगढे येथील खडकवासला कालव्यात टाकण्यास सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. तसेच उजनीवरून होणाऱ्या लाकडी निबोडी उपसा जलसिंचन योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही योजनांवरून सोलापूर व इंदापूर तालुक्यातील शेतकरी असा संघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम चालू आहे. तसेच या याविषयी सर्वपक्षीय पाणी संघर्ष समिती स्थापन करण्याची तयारीही इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सध्या चालवली आहे.

याबाबतच्या नियोजनाची व या मंजूर योजनेविषयी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच तालुक्यातील शेतीसिंचनाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण विसरून या पाण्यासाठीच्या लढ्यात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या शेतीसिंचनाचा प्रश्न मिटविण्यासाठी प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून या विषयात साथ द्यावी लागणार आहे. तसेच शेतीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढा लढण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचेही सांगितले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, यांचेसह प्रकाश ढवळे, हनुमंतराव वाबळे, तुकाराम बंडगर, माउली भोसले, विराज भोसले, बबन सोलनकर, कैलास वणवे, अमर भोसले, दादा वणवे, रोहित हेळकर, दादा भोसले, यांच्यासह शेटफळगढे परिसरातील सर्व गावचे शेतकरी बांधव या वेळी उपस्थित होते.

--------------------------

फोटोओळी- शेटफळगढे (ता. इंदापूर) येथे शेतकऱ्यांना उजनीवरील योजनेची व आगामी नियोजनाची माहिती देताना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील.

१३०५२०२१ बारामती—०५

-----------------------------

Web Title: The water of 'Ujani' will be lit in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.