पाणीपुरवठा दोन वेळा होणार
By Admin | Updated: November 6, 2014 00:31 IST2014-11-06T00:31:42+5:302014-11-06T00:31:42+5:30
दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक व नागरिकांकडून होत आहे.

पाणीपुरवठा दोन वेळा होणार
पिंपरी : दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक व नागरिकांकडून होत आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन पाणीपुरवठा
करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात लवकरच दोनवेळा पाणीपुरवठा होणार आहे.
गतवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला शहराला सामोरे जावे लागले. उन्हाळा संपल्यानंतर दोन महिन्यांनी पाऊस झाला. दरम्यानच्या कालावधीत दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पवना धरणात पाणीसाठा होऊ लागल्यामुळे महापालिकेने जुलैपासून एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. अजूनही एकच वेळ पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेच्या ६४ पैकी फक्त ४० प्रभागांत दोन वेळा, तर उर्वरित २४ प्रभागात एक वेळ पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिवसातून एकदाच, मात्र जास्त वेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नगसेवकांनी दोन वेळ पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.
पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी नगरसेवक, गटनेते, पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांमध्येच पाणीपुरवठ्यावरून दोन गट पाहायला मिळाले. मात्र, आपण पूर्ण पाणी उचलून ते शहराला पुरवत आहोत. एकवेळ पाणी देत असलो, तरी काटकसर किंवा बचत केली जात नसल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगितले. आयुक्त जाधव म्हणाले, ‘‘दोन वेळ पाणीपुरवठ्याच्या मागणीनंतर शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये बदल करण्यासाठी प्रभागनिहाय पाणीपुरवठा व समस्यांची पाहणी करू.’’(प्रतिनिधी)