झारगडवाडीचा पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: January 21, 2016 01:15 IST2016-01-21T01:15:16+5:302016-01-21T01:15:16+5:30
बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतीने गेल्या चार-पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पाणीपट्टी व घरपट्टी थकीत असल्याच्या कारणावरून बंद केला आहे.

झारगडवाडीचा पाणीपुरवठा बंद
डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतीने गेल्या चार-पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पाणीपट्टी व घरपट्टी थकीत असल्याच्या कारणावरून बंद केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. मात्र, नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांनी ग्रामपंचायतीने आमच्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे.
पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना विहिरीचे किंवा आडाचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. दूषित पाणी पिल्याने साथीचे आजार पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सोनगाव, मेखळी, प्रादेशीक नळ पाणीपुरवठा योजना संयुक्त समिती या योजनेतून चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी प्रत्येक गावाकडुन पाणी पट्टी आकारली जाते. ज्या गावची पाणीपट्टी थकीत राहते. त्या गावचा पाणीपुरवठा समितीकडुन बंद केला जातो.
गावात घरपट्टी व पाणीपट्टी थकीत आकडेवारी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. त्या शिवाय वसूल गोळा होणार नाही, अशी चर्चा आहे. थकीत ग्रामस्थांचे नळजोड तोडुन त्यांचा पाणीपुरवठा खंडीत करावा, अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी गावात वसुलीसाठी फिरत आहेत. थोड्या फार प्रमाणात पाणीपट्टी गोळा होत आहे. ग्रामस्थांनी आपली जबाबदारी म्हणून पाणीपट्टी भरावी, असे अवाहन झारगडवाडी ग्रामपंचायती कडून केले आहे. (वार्ताहर)