सम-विषम तारखांना पाणीपुरवठा
By Admin | Updated: September 8, 2015 04:52 IST2015-09-08T04:52:43+5:302015-09-08T04:52:43+5:30
शहराला एक दिवसाआड पाणी पुरविण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने सोमवार, बुधवार, शुक्रवार व मंगळवार, गुरुवार, शनिवार असे दोन भाग करून शहराला पाणी देण्याचे

सम-विषम तारखांना पाणीपुरवठा
पुणे : शहराला एक दिवसाआड पाणी पुरविण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने सोमवार, बुधवार, शुक्रवार व मंगळवार, गुरुवार, शनिवार असे दोन भाग करून शहराला पाणी देण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यामध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्याने सम व विषम तारखांनुसार पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तातडीने त्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या भागाला सोमवार, बुधवार, शुक्रवार असा पाणीपुरवठा होणार होता तिथे विषम तारखांना; तर मंगळवार, गुरुवार, शनिवार असा पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना सम तारखांना पाणीपुरवठा होणार असल्याची सुधारणा करण्यात आली आहे.
शहरात सोमवार (७ सप्टेंबर)पासून पाणीकपातीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
विषम तारखांना पाणीपुरवठा होणार भाग : बंडगार्डन विभागात येरवडा, कलवडवस्ती, आळंदी रोड, कल्याणीनगर, विमाननगर, कोरेगाव पार्क, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, मंगळवार पेठ यांना पूर्वीप्रमाणे वेळेत पाणीपुरवठा होईल. चंदननगर, वडगावशेरी, चौधरीवस्ती, थिटेनगर, खुळेवाडी, खराडकर पार्क अभिरुची मॉल, हिंगणे परिसर, आपटे कॉलनी, खंडोबा परिसर, धायरी, डीएसके पायथा, साळुंखे विहार, कुदळे पार्क, विक्रांत पॅलेस, गोविंद अपार्टमेंट, विठ्ठलवाडी, महालक्ष्मी सोसायटी, दिनकर पठारेवस्ती, मारुतीनगर, माणिकबाग या परिसराला वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा होईल.
समतारखांना पाणीपुरवठा होणारा भाग : स्वारगेट जलकेंद्रातील दांडेकर पूल, सर्व पेठा, राजाराम पुलाच्या अलीकडील भाग यांना सकाळी ५ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा होईल. लष्कर विभागात मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, महंमदवाडी, वानवडी, कोंढवा गावठाण, कॅम्प, ससून हॉस्पिटल येथे पूर्वीप्रमाणे वेळेत पाणीपुरवठा होईल.
एसएनडीटी विभागात रामबाग कॉलनी काशिनाथ सोसायटी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमाननगर या परिसराला सकाळी ५ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा होईल. कोथरूड गावठाण, डहाणूकर कॉलनी, गुजराथ कॉलनी, करिष्मा सोसायटी, मयूर कॉलनी, नळस्टॉप, मंगेशकर हॉस्पिटल, सुतारदरा, कर्वेनगर कॅनॉल, म्हाडा वसाहत, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर पोलीस ठाणे परिसर, शिवाजीनगर गावठाण, बोपोडी, औंध रोड, कामगार पुतळा येथील परिसरामध्ये वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा होणार आहे.
दररोज पाणीपुरवठा होणारा काही भाग : कोंढवा, साईनगर, गजानन महाराजनगर, काकडेवस्ती, अप्पर इंदिरानगर, बालाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, एलोरा परिसर, भारती विद्यापीठ, भारती विहार, धनकवडी गावठाण, साईदत्तनगर, कृष्णामाई सोसायटी, आंबेगावर पठार, दत्तनगर व सहकारनगर.
(प्रतिनिधी)
शुक्रवारपासून जाणवणार पाणीकपातीचे बदल
प्रशासनाकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात येत्या शुक्रवारपासून त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यामुळे आज शहराच्या बहुतांश भागात पाणीकपातीचा दिवस असतानाही पाणी आले होते. मात्र, नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, शुक्रवारपासून पाणीकपातीची प्रत्यक्षात परिणाम दिसून येतील, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हॉटेलमध्ये बाटलीमधून पाणी द्यावे
शहरातील पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृहे यांमधील ग्राहकांना ग्लासातून पाणी न देता पाण्याच्या बाटलीतून पाणी देण्यात यावे, अशी महत्त्वाची सूचना महापालिका प्रशासनाने केली आहे. त्याचबरोबर, शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये होणाऱ्या बैठकांच्या वेळी होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा, अशीही सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
वेळापत्रकातील झालेला बदल
पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर करताना
ज्या भागांना सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी पाणीपुरवठा होईल असे जाहीर केले होते, तिथे
विषम तारखांना पाणीपुरवठा होणार आहे. तर, ज्या भागांना मंगळवारी, गुरुवारी व शनिवारी पाणीपुरवठा होईल असे जाहीर करण्यात आले होते, तिथे सम तारखांना पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
पाण्याच्या वेळापत्रकात झाली चूक
पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे वेळापत्रक जाहीर करताना सोमवार, बुधवार, शुक्रवार व मंगळवार, गुरुवार, शनिवार अशा दोन टप्प्यांमध्ये पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले. मात्र, एक दिवसाआड तत्त्वानुसार शुक्रवारनंतर रविवारी दुसऱ्या भागाला शनिवारनंतर सोमवारी पाणीपुरवठा करावा लागणार होता. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला पाणी सोडण्याच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा लागला असता. सोमवारी प्रशासनाच्या ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने निवेदन प्रसिद्धीला देऊन सम व विषम तारखांनुसार वेळापत्रक जाहीर केले आहे.