पाणीपुरवठ्याची भिस्त टॅँकरवरच
By Admin | Updated: July 7, 2015 04:48 IST2015-07-07T04:48:00+5:302015-07-07T04:48:00+5:30
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शहर आणि परिसरात झालेल्या दमदार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील धरणांमध्ये चार महिन्यांचा पाणीसाठा झाला.

पाणीपुरवठ्याची भिस्त टॅँकरवरच
पुणे : जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शहर आणि परिसरात झालेल्या दमदार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील धरणांमध्ये चार महिन्यांचा पाणीसाठा झाला असला, तरी पुणेकरांना अद्यापही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे जून महिन्यातही शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचा आकडा १५ हजारांच्या घरात पोहोचला होता. विशेष म्हणजे एकीकडे पावसाळ्यात पाण्याची मागणी कमी होत असताना, टँकरच्या फेऱ्यांमध्ये मात्र कोणतीही घट झालेली नसल्याचे दिसून येते.
-------------
शहराचा आकार बशीसारखा असल्याने तसेच महापालिकेची पाणी वितरण व्यवस्था जुनाट असल्याने शहरात असमान पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव पाण्यासाठी खासगी, तसेच महापालिकेच्या टँकरचा आधार घ्यावा लागतो.
त्यामुळे शहरात जवळपास वर्षभर टँकरच्या पाण्याची मागणी असते. मात्र, हे प्रमाण जून ते डिसेंबर या कालावधीत दर महिन्यास सरासरी १० ते ११ हजार असते, तर जानेवारी ते मेपर्यंत हा आकडा सुमारे १५ हजारांच्या घरात जातो.
या वर्षी जून महिन्यातच पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतरही ३० जून अखेर शहरात सुमारे १४ हजार ६०० टँकरच्या फेऱ्या झालेल्या असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मे २०१५च्या तुलनेत ही टँकरची संख्या अवघी ४००ने घटली आहे. (प्रतिनिधी)
खासगी टँकरचीच चलती
शहरात जून महिन्यात तब्बल १४ हजार ६०० टँकरच्या फेऱ्या झालेल्या असल्या, तरी त्यातील अवघ्या १ हजार २८४ फेऱ्या महापालिकेच्या टँकरच्या आहेत. तर उर्वरित १३ हजार फेऱ्या या खासगी टँकरच्या आहेत. महापालिकेच्या ताफ्यात अवघे १५ टँकर असल्याने, तसेच ज्या ठिकाणी पाणी नाही आले त्याच ठिकाणी पालिकेकडून नगरसेवकांच्या मागणीनुसार टँकर पुरविला जातो. मात्र, पाणी कमी आल्यास अथवा कमी दाबाने येत असल्याने नागरिकांना मनमानीदाराने शुल्क वसूल केल्या जाणाऱ्या खासगी टँकरचाच आधार घ्यावा लागत असल्याचे यावरून दिसून येते.