पुरंदरमध्ये पाणीटंचाई
By Admin | Updated: March 24, 2017 03:56 IST2017-03-24T03:56:58+5:302017-03-24T03:56:58+5:30
गेल्या वर्षी जिल्ह्यात वर्षभर टंचाईच्या झळा सुरू होत्या. टँकर बंदच झाले नव्हते. या वर्षी या थोडासा दिलासा मिळाला असून,

पुरंदरमध्ये पाणीटंचाई
जेजुरी : गेल्या वर्षी जिल्ह्यात वर्षभर टंचाईच्या झळा सुरू होत्या. टँकर बंदच झाले नव्हते. या वर्षी या थोडासा दिलासा मिळाला असून, मार्चअखेर टँकर सुरू झाले आहेत. टँकरची मागणी होऊ लागली असून आता फक्त पुरंदर तालुक्यात ४ टँकरने ३ गावांतील २१ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. ८ हजार २८ लोकांना सध्या टंचाईची झळ बसत आहे.
पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील राख, वाल्हे, पिंपरी, एखतपूर, मुंजवडी या गावांचे टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अजूनही साकुर्डे, जेजुरी ग्रामीण, बेलसर, सोनोरी, दिवे, मावडी क.प., बहिरवाडी, नावळी, घेरा पुरंदर, कुंभारवळण, भोसलेवाडी, कर्नलवाडी, राजुरी गावांतील टँकरचे प्रस्ताव दाखल असल्याची माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी दिली आहे.
या वर्षी पुरंदर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पूर्व पुरंदरच्या पट्ट्यात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पश्चिम पट्ट्यातील सुमार पावसामुळे कऱ्हा नदीतून वाहिलेल्या पाण्यावर नाझरे जलाशयात केवळ ४० टक्केच (३८५ दशलक्ष घनफूट) पाणीसाठा निर्माण झाला होता. त्यावर परिसरातील पाणी योजनांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी ही इतर गावांची पिण्याच्या पाण्याची तीव्रता दिवसेंदिवस तीव्र स्वरूपाची होऊ लागली आहे.
इतर ६ गावठाणे आणि ६८ वाड्यावस्त्यांवरील १३ हजार ७२१ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागणार आहेत. लवकरच येथील टँकरचे प्रस्ताव मंजूर होऊन टँकर सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे रवींद्र गायकवाड यांनी संगितले. वरील गावांचे पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे उद्भव आटलेले असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. (वार्ताहर)