न्हावरे परिसरात पाणीप्रश्न गंभीर
By Admin | Updated: November 9, 2015 01:31 IST2015-11-09T01:31:38+5:302015-11-09T01:31:38+5:30
शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळू लागली आहेत.

न्हावरे परिसरात पाणीप्रश्न गंभीर
न्हावरे : शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्येलादेखील ग्रामस्थांना गंभीरपणे सामोरे जावे लागत आहे. तरी या परिसरात चासकमानचे आवर्तन त्वरित सोडण्यात यावे; अन्यथा सिंचन भवनाच्या दारात उपोषण करून तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार अशोक पवार यांनी दिला आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी शिरूर आणि खेड तालुक्यांसाठी चासकमानचे आवर्तन सोडताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘टेल टू हेड’ हा नियम डावलून चुकीच्या पद्धतीने ‘हेड टू टेल’ या पद्धतीने आवर्तन सोडले. परिणामी, न्हावरे परिसरातील न्हावरे, उरळगाव, आंधळगाव, आलेगाव पागा, निर्वी ही गावे चासकमानच्या आवर्तनापासून पूर्णपणे वंचित राहिली आहेत. तरी चासकमानच्या याअगोदरच्या आवर्तनापासून वंचित राहिलेल्या गावातील शेतकऱ्यांना प्राधान्याने प्रथम पाणी देण्यात यावे, अशी मागणी अशोक पवार यांनी केली आहे.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चासकमानचे आवर्तन हेड टू टेल या चुकीच्या नियमाने सोडण्याचा फटका शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील गावांनाही बसला आहे. टेल टू हेड या पद्धतीने पाणी सोडल्यास कालव्यातील पाणी पाझरून त्याचा फायदा या भागातील भूजलपातळी उंचावण्यास होतो. दरम्यान, अशा स्वरूपाचा फायदा हेड टू टेल या चुकीच्या नियमाने आवर्तन सोडल्याने पश्चिम भागातील गावांना झालेला नाही.
चासकमानचे आवर्तन टेल टू हेड सोडावे यासाठी न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांनी दोनदा रास्ता रोको करून आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनाची दखल संबंधित विभागाकडून घेतली गेली नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या गलथान कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे.
दरम्यान, अधिकाऱ्याच्या चुकीच्या निर्णयाचा फटका या भागातील ग्रामस्थ गेली वर्षभर सहन करत आहेत. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरील बाबींची गंभीर दखल घेऊन न्हावरे परिसरासाठी चासकमान आवर्तन त्वरित सोडावे; अन्यथा शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार अशोक पवार यांनी दिला आहे.
(वार्ताहर)