‘नाझरे’चे पाणी पळविले

By Admin | Updated: September 25, 2014 06:18 IST2014-09-25T06:18:43+5:302014-09-25T06:18:43+5:30

आज या कालव्यातून आवर्तनाव्यतिरिक्त दररोज ४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

The water from 'Nazare' ran away | ‘नाझरे’चे पाणी पळविले

‘नाझरे’चे पाणी पळविले

जेजुरी : येथील नाझरे जलाशय भरला असून, नीरा पाटबंधारे विभागाच्या कृपेने जलाशयातील पाणी नदीतून जाण्याऐवजी कालव्याद्वारे बारामती तालुक्यातील पाझर तलाव, नाला बंडिंग भरून घेतले जात आहेत. यामुळे स्थानिक शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. आज या कालव्यातून आवर्तनाव्यतिरिक्त दररोज ४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातून कऱ्हा नदीतून येणारे पाणी जलाशय भरल्यानंतर नदीपात्रातून बारामती तालुक्यात पोहोचते. यामुळे नदीकाठच्या गावांना याचा मोठा फायदा होतो. या वर्षी गेल्या १५ सप्टेंबरला जलाशय भरला, तरीही जलाशयाच्या खाली नदीपात्रात पाणी आलेच नाही.
जलाशय भरूनही पाणी का नाही, याची माहिती घेतली असता नीरा पाटबंधारे विभागाचा हा अजब प्रकार उघडकीस आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शिवाय, या संदर्भात माहिती घेतली असता कर्मचारी व अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीचीच उत्तरे दिली. नाझरे जलाशय शाखाधिकारी शहाजी सस्ते यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नीरा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दिगंबर दुबल यांच्याशी संपर्क साधून माहिती घ्या, असेच उत्तर दिले आहे. तर, दुबल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
जलाशयातून कालव्याद्वारे वर्षातील चार वेळच्या आवर्तनाव्यतिरिक्त पाणी सोडणे गैर असून, राजरोसपणे ही पाण्याची चोरीच होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. कालव्यातून होणारी पाण्याची चोरी दोन दिवसांत बंद न झाल्यास जनआंदोलन करून ते बंद करावे लागेल, असे नाझरे क.प.चे उपसरपंच संदीप चिकणे यांनी म्हटले आहे.
नाझरे जलाशय पुरंदर तालुक्यात आहे, त्याचा फायदा पुरंदरला नाहीच. आम्हाला पुरंदर उपसासारख्या योजनेतून विकत पाणी आणि बारामतीला फुकट पाणी, हा दुजाभाव असून हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नाझरे क.प.चे उपसरपंच संदीप चिकणे यांनी व्यक्त केली आहे. पुरंदर उपसातून पुरंदरमधील पाझर तलाव भरण्यासाठी आम्हाला पैसे मोजावे लागतात आणि बारामती तालुक्यातील पाझर तलाव फुकटात•भरले जातात, हा कोणता न्याय? कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, आता तो खपवून घेतला जाणार नाही. तसेच, गेल्या दहा दिवसांत कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी त्वरित बंद करावे व सोडण्यात आलेल्या पाण्याचे बिल पाटबंधारे विभागाच्या आधिकाऱ्यांकडून वसूल करावे, अशी मागणी चिकणे, नाझरे क.प.चे माजी उपसरपंच संतोष नाझिरकर, रोहिदास खैरे, जालिंदर वायसे, मधुकर गाढवे, जवळार्जुनचे सरपंच अप्पासाहेब राणे, मावडी क.प.चे सरपंच अनिल भामे तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना•भटणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.

Web Title: The water from 'Nazare' ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.