पाणी मीटर चोरीचे वाढते सत्र
By Admin | Updated: June 17, 2015 22:44 IST2015-06-17T22:44:32+5:302015-06-17T22:44:32+5:30
बारामती एमआयडीसी परिसरातील नागरिक वेगळ्याच समस्येने त्रस्त झाले आहेत. या परिसरातील नागरिकांचे चक्क पाणी मीटर चोरीला

पाणी मीटर चोरीचे वाढते सत्र
बारामती : बारामती एमआयडीसी परिसरातील नागरिक वेगळ्याच समस्येने त्रस्त झाले आहेत. या परिसरातील नागरिकांचे चक्क पाणी मीटर चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत. २०० हून अधिक नागरिकांचे पाणी मीटर चोरीला गेले आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
विशेषत: एमआयडीसी परिसरातील सायली हिल, सूर्यनगरी भागातील नागरिकांना पाणी मीटर चोरीचा फटका बसला आहे. गेल्या दीड महिन्यात परिसरामधील २०० हून अधिक पाणी मीटरची चोरी झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.
त्यासाठी पाणी मीटरनुसार वापरलेल्या पाण्याचे प्रति दोन महिन्याला बिल आकारले जाते. भुरट्या चोऱ्यांना नागरिक तोंड देतात. मात्र, पाणी मीटर चोरीच्या वाढत्या प्रकाराने येथील नागरिक चक्रावून गेले आहेत. विशेषत: सदनिका, गृहसंस्थामध्ये चोरीचे प्रमाण अधिक आहे. सायली हिल परिसरातील श्री स्वामी समर्थ रेसिडन्सीमधील एकाच वेळी १२ पाणी मीटरची चोरी झाल्याचे येथील नागरिक सनतकुमार रांगोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या चोरीबाबत स्वामी समर्थ रेसिडन्सी सोसायटीच्या अध्यक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिल्याचे त्यांनी सांगितले. पाणी मीटर चोरीबाबत काही नागरिकांनी पोलिसात तक्रारी दिल्याचे सांगितले. मात्र, पाणी मीटर चोरीला गेलेल्या सर्व नागरिकांनी पोलीस तक्रारीचा पर्याय स्वीकारलेला नाही. किरकोळ रकमेसाठी पोलिसांमध्ये तक्रार नको, या हेतूने या नागरिकांनी पाणी मीटर चोरीनंतरही पोलिसांपासून दूर राहणे पसंत केले आहे. याबाबत जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता बी. बी. भुंजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना अधिक माहिती दिली. सूर्यनगरी, सायली हिल परिसरात पाणी मीटरची मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. १०० ते १२५ नागरिकांनी चोरीबाबत तक्रारी केल्या आहेत.