‘वॉटर हॅमर’ने जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार
By Admin | Updated: January 7, 2015 00:42 IST2015-01-07T00:42:40+5:302015-01-07T00:42:40+5:30
थंडीमुळे पालिकेच्या मोठ्या जलवाहिन्यांमध्ये ‘वॉटर हॅमर’ तयार होत असून, गेल्या महिनाभरात शहरात जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वाढले आहेत.

‘वॉटर हॅमर’ने जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार
पुणे : थंडीमुळे पालिकेच्या मोठ्या जलवाहिन्यांमध्ये ‘वॉटर हॅमर’ तयार होत असून, गेल्या महिनाभरात शहरात जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत डिसेंबर २०१४ मध्ये ९०० हून अधिक तक्रारी पालिकेकडे आल्या असून, त्यातील तब्बल ५०० ठिकाणी ‘वॉटर हॅमर’मुळे जलवाहिन्या फुटल्या असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
थंडीमुळे पाण्याचे आकारमान वाढल्याने, मोठ्या जलवाहिन्यांमध्ये पाण्याचे जडत्व वाढते. त्यामुळे हवेचा दाब निर्माण होऊन हे ‘वॉटर हॅमर’ तयार होतात. शहरात महापालिकेच्या सुमारे ३६०० किलोमीटरच्या लहान मोठया जलवाहिन्या आहेत. त्यातील जवळपास १५०० किमी जलवाहिन्यांचे जाळे जवळपास वीस ते पंचवीस वर्षे जुने आहे. त्यातील मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात फुटत आहेत. गेल्या महिनाभरात ‘वॉटर हॅमर’मुळे ठिकठिकाणी जलवाहिन्या दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
‘एअर वॉल्व्ह’ नसल्याने
पर्याय नाही
४जलवाहिनीतील हवेचा दाब बाहेर काढण्यासाठी, जलवाहिनीच्या प्रत्येक ५०० मीटर अंतरावर ‘एअर व्हॉल्व्ह’ असणे आवश्यक आहे. गेल्या दशकभरापर्यंत हे ‘व्हॉल्व्ह’ प्रशासनाकडून बसविण्यात येत होते. मात्र, त्यानंतर शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबर जलवाहिन्याचे जाळेही वाढले. मात्र, व्हॉल्व्ह बसविणे बंद झाले. तसेच, सततच्या रस्त्यांच्या कामांमुळे मोठ्या जलवाहिन्यांवर बसविण्यात आलेले अनेक ‘व्हॉल्व्ह’ जमिनीखाली गाडले आहेत. त्यामुळेही जलवाहिन्या फुटत आहेत.
थंडीत पाण्याचे आकारमान वाढून वेगाने जाणाऱ्या पाण्याने हवेचा दाब तयार होतो. हा हवेचा दाब बाहेर काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने, हा दाब हातोड्याप्रमाणे काम करून जलवाहिनीच्या कमकुवत भागातून बाहेर पडतो. त्यामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडतात. हिवाळ्यात हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे.
-व्ही. जी. कुलकर्णी,
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख.