पाण्याच्या प्रवाहाने रस्ता गेला वाहून
By Admin | Updated: October 7, 2016 03:40 IST2016-10-07T03:40:54+5:302016-10-07T03:40:54+5:30
कुरकुंभ व परिसरातील भागात झालेल्या पावसाने कुरकुंभ येथील ओढ्यात पाण्याच्या प्रमाणात चांगल्या प्रकारे वाढ झाली, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ओढा खोलीकरणामुळे

पाण्याच्या प्रवाहाने रस्ता गेला वाहून
कुरकुंभ : कुरकुंभ व परिसरातील भागात झालेल्या पावसाने कुरकुंभ येथील ओढ्यात पाण्याच्या प्रमाणात चांगल्या प्रकारे वाढ झाली, तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ओढा खोलीकरणामुळे पाण्याची साठवणूकसुद्धा झाली. परिणामी, शेतकऱ्यांना याचा उपयोग होत आहे. मात्र या पाण्याच्या प्रवाहाने पाणंद रस्त्यावरील मातीचा भराव वाहून गेल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कुरकुंभ येथील गिरमे वस्ती व जाधव वस्ती या परिसरात असणाऱ्या ओढ्यावरील मातीचा भराव वाहून गेला; परिणामी या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांना यातूनच मार्ग काढत शेतीची कामे करावी लागतात. मात्र, अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढणे अत्यंत जिकिरीचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत; तसेच ग्रामपंचायतीकडे याबाबत तोंडी चर्चा झाल्याचे समजते.
दरम्यान, शेतात जाण्यासाठी रात्री -अपरात्री या रस्त्याचा वापर करताना ओढ्यापलीकडे राहणारे
नागरिक, विद्यार्थी, तसेच शेतकरी यामधून मार्ग काढण्याची मागणी करीत आहेत.
ओढा खोलीकरणामुळे पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा झाल्यामुळे परिसरातील विहिरी व शेतीसाठी याचा फायदा झाला; मात्र या झालेल्या कामाबाबतदेखील आक्षेप घेण्यात आला. काम झाल्यानंतर याची बिले काढण्यासाठी हेच लोक विरोध करीत आहेत व परत कामे करीत नाही, असा आरोप करतात. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी कामे करताना अडवणूक करण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. दरम्यान, वाहून गेलेल्या रस्त्याचे काम लवकर करण्याचा प्रयत्न केला जाईल .
- जयश्री भागवत, सरपंच कुरकुंभ
४या परिसरातील रस्ता वाहून गेला असल्यामुळे नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय झालेली आहे. त्याचप्रमाणे या भागातून वाहतूक करणे, तसेच ये-जा करणेही जिकिरीचे झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडूनच तातडीने पावले उचलून हा रस्ता नव्याने तयार व्हावा, अशी सर्वांचीच मागणी आहे.
४एका बाजूला झालेल्या चांगल्या कामांविषयी शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. परंतु, दैनंदिन गरजेचा रस्ताच नसेल, तर अनेक कामे अडून राहतात. यामुळे लवकरात लवकर रस्ता व्हावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. प्रशासनाने लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.