पाणीकपात रखडली
By Admin | Updated: September 2, 2015 04:26 IST2015-09-02T04:26:17+5:302015-09-02T04:26:17+5:30
धरणक्षेत्रामध्ये खूपच कमी पाऊस झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात करून एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे

पाणीकपात रखडली
पुणे : धरणक्षेत्रामध्ये खूपच कमी पाऊस झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात करून एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र महापौर दत्तात्रय धनकवडे हे परदेश दौऱ्यावर असल्याने ते परत आल्यानंतरच त्याची घोषणा करण्यात येणार आहे. पाण्याची परिस्थिती गंभीर होत असताना महापौराची प्रतीक्षा करण्याची चुकीची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
शहरामध्ये १ सप्टेंबरपासूनच पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऐनवेळी तो पुढे ढकलावा लागला आहे. वस्तुत: आयुक्त महापौरांशी फोनवर चर्चा करून हा निर्णय घेऊ शकत असतानाही त्याला विलंब लावला जात आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या १४. ६७ टीएमसी पाणीसाठी उपलब्ध आहे, गेल्यावर्षी हाच पाणीसाठा २६.७४ टीएमसी एवढा उपलब्ध होता त्यावेळी पाणीकपात लागू करण्यात आली होती. मागील वर्षी १ जून २०१४ अखेर एकवेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला व ५ जुलै २०१४ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता.
याबाबत उपमहापौर आबा बागूल यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र दिले आहे. शहराला आगामी काळात लागणाऱ्या पाण्यासाठी तातडीने पाणीबचतीसाठी नियोजन होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवापर्यंत शहरामध्ये एक वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा, उत्सव संपल्यानंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा. मराठवाड्याप्रमाणे पुण्यातील पाण्याची परिस्थिती गंभीर बनू नये, याकरिता आतापासूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे. आजच्या तारखेपर्यंत उपलब्ध असलेला पाणीपुरवठा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवला जावा, धरणांमधून शेतीला होत असलेला पाणीपुरवठा तत्काळ थांबविण्यात यावा, असे आबा बागूल यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.