राजगुरुनगरवर पाणीसंकट

By Admin | Updated: May 25, 2016 04:39 IST2016-05-25T04:39:51+5:302016-05-25T04:39:51+5:30

साधे स्वच्छ पाणी तर सोडाच; परंतु अक्षरश: सांडपाण्यासारखे पाणी राजगुरुनगरमध्ये येत असल्याने राजगुरुनगरवर पाणीसंकट आलेले आहे. इतकी कठीण परिस्थिती झाली

Water congestion on Rajgurunagar | राजगुरुनगरवर पाणीसंकट

राजगुरुनगरवर पाणीसंकट

राजगुरुनगर : साधे स्वच्छ पाणी तर सोडाच; परंतु अक्षरश: सांडपाण्यासारखे पाणी राजगुरुनगरमध्ये येत असल्याने राजगुरुनगरवर पाणीसंकट आलेले आहे. इतकी कठीण परिस्थिती झाली आहे, की त्याचे पडसाद समाज माध्यमांमध्ये उमटत आहेत. गावकऱ्यांना ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ अशी पोस्ट सर्वत्र फिरत आहे.
राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याची पाणीपातळी आता खूपच खाली गेली आहे. बंधाऱ्याचे पात्र उघडे पडून वाळू दिसू लागली आहे. आधीच पाणी अत्यल्प आणि त्यात सांडपाणी येत असल्याने असलेले पाणीही खूप खराब झाले आहे. ते शेवाळले आहे. तसेच त्याला दुर्गंध येत आहे.
या पार्श्वभूमीवर चासकमानच्या धरणातून केदारेश्वर बंधाऱ्यात त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी नगर परिषदने पुणे पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्याकडेही आपली मागणी दिली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांनी दिली. आमदार सुरेश गोरे यांनी राजगुरुनगरला लगेच पाणी सोडण्यात यावे, असे संबंधितांना कळविले आहे.
बंधाऱ्यावरील भागातून शेतीसाठी होणारा पाणीउपसा आणि तीव्र उन्हाळा यामुळे पाणीसाठा संपला असून सध्या दूषित झालेला जलस्रोत आणि अल्पसाठ्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पाणी सोडावे, अशी मागणी नगर परिषदेने केली आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले. (वार्ताहर)

नळातून गावाला काळपट हिरवे पाणी
सध्या पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याने हे सांडपाणी आणि शेवाळलेले पाणी काही प्रमाणात पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाझरत असून गावाला काळपट हिरवे पाणी नळातून येत आहे. हेच पाणी गावकऱ्यांना वापरावे लागत असून आता ते अंघोळ करण्याच्याही लायकीचे राहिले नाही. पिण्यासाठी लोक दुसरे पाणी वापरत असून सध्याच्या पाण्याने चूळसुद्धा भरता येत नाही. तसेच गावातील लोकांना या पाण्यामुळे त्वचेला खाज येण्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

आणखी १० दिवस अशुद्ध पाणी?
जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण होऊन गावाला आठवड्यात शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल, असे नगर परिषदेकडून सांगण्यात आले आहे. पण तोपर्यंत सुमारे १० दिवस सध्याचे दूषित पाणी वापरणे अशक्यप्राय आहे. तसेच शुद्ध पाणी देण्यासाठी मुळात बंधाऱ्यात पाणी असणे आवश्यक आहे. म्हणून चासकमान धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.

उपशाला घाला पायबंद : गोरे
राजगुरुनगरला पाणी सोडण्यात येईल, पण आता नगर परिषदेने ते काटकसरीने वापरावे, असे आमदार सुरेश गोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पाण्याची गळती, त्याचे दूषित होणे आणि इतर कारणांसाठी होणारा उपसा याला पायबंद घालावा आणि पाणी जपून वापरावे, असेही त्यांनी सांगितले. धरणात अत्यल्प पाणी असल्याने आणि पाऊस लांबला तर यापुढे पाणी सोडणे कदाचित शक्य होणार नाही, असे गोरे म्हणाले.

Web Title: Water congestion on Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.