संथ कामांंंंमुळे बारामतीकरांवर पाणीसंकट

By Admin | Updated: February 14, 2016 03:18 IST2016-02-14T03:18:33+5:302016-02-14T03:18:33+5:30

अत्यंत संथगतीने चालणाऱ्या प्रशासनाच्या कामामुळे बारामतीकरांवर पाणीसंकट आले आहे. धरणातील पाणीसाठा कमी आहे. त्यातच २०१२ पासून सुरू असलेल्या साठवण तलावाचे

Water congestion on Baramati by slow actions | संथ कामांंंंमुळे बारामतीकरांवर पाणीसंकट

संथ कामांंंंमुळे बारामतीकरांवर पाणीसंकट

बारामती : अत्यंत संथगतीने चालणाऱ्या प्रशासनाच्या कामामुळे बारामतीकरांवर पाणीसंकट आले आहे. धरणातील पाणीसाठा कमी आहे. त्यातच २०१२ पासून सुरू असलेल्या साठवण तलावाचे काम अद्याप पूर्ण नाही. त्यामुळे मागील महिन्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. आता आवर्तन लांबल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आली आहे. कामाचा ठेका दिल्यापासून वादग्रस्त ठरलेले काम पूर्ण कधी होणार, अशी विचारणा केली जात असताना ठेकेदाराने वाढीव कामासाठी आणखी २७ कोटी रुपयांची जादा मागणी केली आहे. त्यामुळे या कामाचा खर्च ६८ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
बारामती नगरपालिकेच्या यापूर्वीच्या साठवण तलावाचे काम याच ठेकेदाराने केले. १२७ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या या तलावाची गळती काढण्यासाठी मागील वर्षी ऐन उन्हाळ्यात साठवलेल्या पाण्याचा उपसा करावा लागला होता. वास्तविक या तलावालादेखील सुरुवातीला ठरलेल्या आर्थिक तरतुदीपेक्षा जादा खर्च झाला होता. कामाचा दर्जाच नसलेल्या ठेकेदरालाच सुरुवातीला ३०० दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या साठवण तलावाचे काम दिले. त्याची निविदा जादा दराने मंजूर करण्यात आली. ४१ कोटी रुपये खर्चाच्या कामाला सुजल निर्मल योजना, यूआयडी एसएसएम योजनेतून निधी उपलबध करण्यात आला. डिसेंबर २०१४ मध्ये काम पूर्ण करण्यात येणार होते. या ठेकेदाराने पूर्वी केलेल्या कामाच्या साठवण तलावाला गळती लागली. दररोज ८ ते १० लाख लिटर्स पाणी मोटार लावून पुन्हा तळ्यात सोडण्याची कसरत नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला करावी लागत होती. याबाबत पत्रव्यवहार केल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. त्यांनी तलावातील पाणी उपसा करून गळती काढण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे नव्या साठवण तलावाच्या कामासाठी खोदलेल्या कामातच पाणी साठवण्यात आले. त्यामुळे काम थांबले. त्यानंतर उर्वरित जागादेखील साठवण तलावासाठी व्यापण्याचा निर्णय झाला. ३०० हून ३५५ दशलक्ष लिटर्स क्षमतेचा साठवण तलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. जळोची, तांदूळवाडी, खंडोबानगरसाठी नगरपालिकेच्या हद्दीत येण्यापूर्वी पाण्याच्या योजना झाल्या. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना या साठवण तलावावर अवलंबून राहावे लागले नाही. मात्र, जवळपास १० पट क्षेत्रफळ वाढलेल्या बारामतीकरांना साठवण तलावाच्या कामात विलंब झाल्याने आज पाणीटंचाईचे संकट सहन करावे लागत आहे. २४ तास पाणीपुरवठा केला जाईल, असे अनेकदा जाहीर करण्यात आले, परंतु साठवण तलावाचे कामच पूर्ण न झाल्यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट ओढावलेले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water congestion on Baramati by slow actions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.