पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर ठेवणार वॉच
By Admin | Updated: March 12, 2017 03:31 IST2017-03-12T03:31:24+5:302017-03-12T03:31:24+5:30
धुळवड, रंगपंचमीच्या दिवशी विविध आयोजकांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या होळीच्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.

पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर ठेवणार वॉच
पुणे : धुळवड, रंगपंचमीच्या दिवशी विविध आयोजकांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या होळीच्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सहा पथकांची नेमणूक केली असून, पाण्याचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत.
यंदा पावसाचे प्रमाण चांगले असले तरी उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. रंगपंचमी आणि धुळवडीच्या दिवशी खडकवासला परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ती टाळण्यासाठी आणि पाण्याचा गैरवापर थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या दोन्ही दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून देखरेख करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे खात्याला दिल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर रंगपंचमीच्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यासाठी करमणूक कर विभागाची परवानगी घेतली जाते. यंदाही अशा पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे सुमारे १८ जणांनी अर्ज केले आहेत. त्यांना प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देताना कोरडी होळी खेळण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच त्या ठिकाणी पाण्याचा वापर होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. त्यामुळे या पार्ट्यांमध्ये पाण्याचा वापर केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राव यांनी दिले आहेत.
(प्रतिनिधी)