पोस्ट कोविड रुग्णांवर राहणार वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:38+5:302021-01-13T04:25:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुक्त रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर आता आरोग्य विभागाकडून वॉच ठेवला जाणार आहे. ...

पोस्ट कोविड रुग्णांवर राहणार वॉच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुक्त रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर आता आरोग्य विभागाकडून वॉच ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील जवळपास ७७ हजार कोरोनामुक्त नागरिकांच्या आरोग्याचा सलग तीन महिने पाठपुरावा केला जाणार असून, त्यासाठी प्रत्येक कोरोनामुक्त रुग्णाला स्वतंत्र हेल्थकार्ड दिले जाणार आहेत. यामध्ये तिन्ही महिन्यांत केलेल्या तपासण्या, तसेच आढळलेल्या आरोग्यविषयक समस्या नमूद केल्या जाणार असून, त्यानुसार उपाय योजना केल्या जातील. देशातील हा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळली आहेत. कोरोना झालेल्या रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यावर अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामाेरे जावे लागते. रुग्ण बरा झाल्यावर साधारणत: ३ महिन्यांनंतर ही लक्षणे दिसू लागतात. आरोग्य तज्ज्ञांनी याला दुजोरा दिला आहे. याला पोस्ट कोविड आजार असे संबोधले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ७४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या कोरोनामुक्त रुग्णांना पोस्ट कोविड आजारांचा त्रास होतो का? हे पाहण्यासाठी तीन महिने त्यांच्यावर वॉच ठेवण्यात येणार आहे. पोस्ट कोविड आजारांवर अभ्यास करणाऱ्या मुंबई तसेच दिल्ली येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात या तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
पुढील तिन महिन्यात या तपासण्या केल्या जातील. जिल्ह्यातील ६० हजार तर पुण्यातील ७७ हजार रूग्णांच्या तपासण्या केल्या जाणार आहे. या साठी हेल्थ कार्ड बनविण्यात आले आहे. यात तापमान, पल्स, रक्तदाब, ऑक्सीजन या सारख्या आदीं तपासण्या केल्या जाणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रूग्णालयात विशिष्ट कक्षात या तपासण्या केल्या जाणार आहे. कोरोना मुक्त झालेल्या प्रत्येक रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेकडेे असून रूग्णांच्या घरी जाऊन त्यांना हेल्थ कार्ड वाटले जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून तपासणीसाठी त्यांना आरोग्य केंद्रात बोलवण्यात येणार आहेत. साधारणत: तिन महिने त्यांच्यावर वॉच ठेवला जाणार आहे. काही गंभीर त्रास आढळल्यास अशांना ससुन, वायसीएम, तसेस पुण्यातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे.
----
चौकट
विशिष्ट वेळेत होणार तपासणी
पोस्ट कोविड रूग्णांना तपासण्यासाठी आरोग्य केंद्रात स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. या साठी ही तपासणी स्वतंत्र डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. हेल्थकार्डवर दिलेल्या सर्व तपासण्यात तसेच त्यांना काही त्रास होत असल्यास त्याची स्वतंत्र तपासणी डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. या तपासण्या करण्यासाठी रूग्णांची संपर्क साधला जाणार आहे. त्यानुसार त्यांना आरोग्य केंद्रात बोलावण्यात येणार आहे.
----
पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी
पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या पुढे हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यांनी या मोहिमेला मंजुरी दिली आहे. हेल्थकार्ड छापण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील महिन्यापासून या तपासण्यांना सुरूवात केली जाणार आहे.
-----
गंभीर लक्षणे आढळ्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार
पोस्ट कोविड आजारांच्या तपासण्या करतांना एखाद्याला गंभीर आजार आढल्यास त्यांना पुण्यातील वायसीएम, ससुन तसेच ज्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना लागु आहे, अशा रूग्णालयात तज्ज्ञं डॉक्टरांद्वारे उपचार केले जाणर आहे.
---
पोस्ट कोविड कोविड केंद्रांना अल्प प्रतिदसाद
जिल्ह्यात कोरानामुक्त झालेल्या रूग्णांना पुन्हा त्रास होत असल्यास त्यांच्या तपासण्यांसाठी जिल्ह्यात तसेच पिंपरीत पोस्ट कोविड सेंटर स्थापन करण्यात आले होते. मात्र, याला अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ १७७ नागरिकांनी या केंद्रांना भेट दिली.
कोट
कोरोना नंतरची लक्षणे तपासण्यासाठी ही मोहिम हाती घेतली जाणार आहे. यासाठी हेल्थ कार्ड तयार करण्यात येत असून आरोग्य सेवकांद्वारे ती कोरोना मुक्त झाललेल्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन दिली जाणार आहे. यानंतर त्यांना थेट संपर्क साधून तपासण्यांसाठी बोलविले जाईल. साधारण महिन्यातून एक वेळा अशी पुढील तीन महिन्यात तपासण्या केल्या जाणार आहेत. अशा प्रकारची मोहिम राबविणारा जिल्हा देशात पहिला ठरले.
- आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी