बोगस डॉक्टरांवर पालिकेचा 'वॉच'
By Admin | Updated: July 7, 2014 05:36 IST2014-07-07T05:36:59+5:302014-07-07T05:36:59+5:30
शहरातील वाढत्या बोगस डॉक्टरांची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, त्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने खास पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

बोगस डॉक्टरांवर पालिकेचा 'वॉच'
पुणे : शहरातील वाढत्या बोगस डॉक्टरांची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, त्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने खास पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक पुढील आठवड्यापासून प्रत्यक्षात कारवाई सुरू करणार आहे.
गेल्या काही वर्षांत शहराची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात वाढली असून झोपडपट्टय़ांचा भागही वाढला आहे. त्या तुलनेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे यंत्रणा कमी असल्याने या भागात महापालिकेची आरोग्य सुविधा पोहोचण्यास विलंब होत आहे. याच कमतरतेचा फायदा बोगस डॉक्टरांनी घेण्यास सुरुवात केली आहे. अधिकृत डॉक्टरांच्या हाताखाली काम केलेल्या डॉक्टरांनी शहराच्या झोपडपट्टय़ांच्या भागात आपले दवाखाने थाटले आहेत, तर काही बोगस डॉक्टरांनी बाहेरच्या राज्यातील बनावट पदव्यांचा गैरवापर करून अक्षरश: रुग्णालये सुरू केली आहेत. या डॉक्टरांना वैद्यकीय सेवेची कोणतीही माहिती नसल्याने ते रुग्णांना चुकीची औषधे देत आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
पथक शहराच्या सर्व भागांत जाऊन या डॉक्टरांची तपासणी करणार आहे. या डॉक्टरांची कागदपत्रे संशयास्पद आढळल्यास त्यांची माहिती संबंधित विभागाला देण्यात येणार असून, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. सोमनाथ परदेशी यांनी दिली. (प्रतिनिधी)