वळतीत भीषण पाणीटंचाई
By Admin | Updated: July 14, 2014 05:11 IST2014-07-14T05:11:10+5:302014-07-14T05:11:10+5:30
उरुळी कांचनपासून साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर असणारे वळती (ता. हवेली) या गावामध्ये गेली ४ वर्षांपासून टँकर सुरू

वळतीत भीषण पाणीटंचाई
उरुळी कांचन : उरुळी कांचनपासून साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर असणारे वळती (ता. हवेली) या गावामध्ये गेली ४ वर्षांपासून टँकर सुरू असून, पाणीटंचाई भीषण असल्याने गावठाणासह वाड्यावस्त्यांवर टँकरची मागणी ग्रामसेवकांचा संप असल्याने पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, तसेच तहसीलदार यांच्याकडे करणार असण्याची माहिती वळतीच्या उपसरपंच सारिका घोलप व ग्रामपंचायत सदस्य संदीप गायकवाड यांनी दिली.
वळती गावची लोकसंख्या दोन हजारांच्या वर असून, वळती परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तर ५०० फुटांपर्यंत विंधन विहिरीची पातळी गेली असूनही, पाण्याचा थेंबही नाही.
रेल्वे स्टेशन, वरचा मळा, खालचा मळा, नागपुरेवस्तीवर असणाऱ्या पाण्याचे पाणवठे आटले असून, हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. १९७२मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये डॉ. दादा गुजर यांनी गावाची कायमस्वरूपी तहान भागवण्यासाठी दगडी बांधकामात बांधून दिलेला तलावही ४ वर्षांपासून कोरडा आहे.
गावात येणाऱ्या दोन टँकरचे पाणी विहिरीत टाकण्यात येते व तेथून गावाजवळच्या टाकीत सोडण्यात येते. पाणी भरण्यासाठी जवळपास २५० प्लॅस्टिकचे कॅन घेऊन नागरिक पहाटेपासून उभे असतात. पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. पाण्यासाठी वादावादीही होतात. या भीषण परिस्थितीमुळे गावातील प्रवेशद्वाराजवळच कॅनची लाईन (रांगा) पाहूनच गावात येणारे पाहुणे पाण्याची पारख करतात. पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांना कोणी मुलीही देईनात, अशी अवस्था झाली असल्याची खंत संतोष घोलप व संदीप गायकवाड यांनी व्यक्त केली.