खुनाच्या बदल्यासाठी वाशिंबेकरांची हत्या
By Admin | Updated: March 26, 2015 23:02 IST2015-03-26T23:02:07+5:302015-03-26T23:02:07+5:30
नगरसेवक धनंजय वाशिंबेकर हत्या प्रकरणातील ५ जणांना इंदापूर पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) सकाळी साडेनऊ वाजता अटक केली.

खुनाच्या बदल्यासाठी वाशिंबेकरांची हत्या
इंदापूर : नगरसेवक धनंजय वाशिंबेकर हत्या प्रकरणातील ५ जणांना इंदापूर पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) सकाळी साडेनऊ वाजता अटक केली. या पाचही आरोपींना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले आहे. सोन्या ऊर्फ अमोल सोनटक्के याच्या नाना ग्रुपचे हे सर्व जण म्होरके आहेत. सोन्या सोनटक्केच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच त्यांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़
अंकुश मधुकर गायकवाड (वय २६, रा. यशवंतनगर इंदापूर), दीपक अभिमान साळुंखे (वय २४, रा. पंचायत समितीच्या पाठीमागे, इंदापूर), नागेश बापू गायकवाड (वय २८, दत्तनगर, इंदापूर), राहुल दत्तात्रय लंबाते (वय २८, रा. इरिगेशन वसाहत, इंदापूर), रवी वसंत भिसे (वय ३०, रा. इंदापूर), अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी पहाटे लोणी काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) येथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामतीचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातील हवालदार शिवाजी निकम, संजय जगदाळे, अशोक पाटील, पोलीस नाईक मारुती हिरवे, बाळू भोई, रविराज कोकरे, संदीप मोकाशी, संदीप कारंडे, सहायक फौजदार ज्ञानेश्वर साळुंखे, पोलीस शिपाई सदाशिव बंडगर यांनी ही कामगिरी केली.
विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी दीपक साळुंखे यांच्याशी फिर्यादी महावीर लोंढे याची झटापट झाली. त्यावेळी साळुंखे यांस कोयता लागून जखम झाली आहे.
सोन्या सोनटक्के याच्या खुनामुळेच वाशिंबेकर यांची हत्या करण्याच्या हेतुनेच त्यांच्यावर
हल्ला करण्यात आला. त्या आधी तीन, चार दिवस त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.
बाजारातून कोयते खरेदी
करण्यात आले होते. आरोपी
रिक्षातून बाबा चौकात आले होते,
असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पाचही आरोपी सर्वसाधारणपणे २४ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. अंकुश गायकवाड, नागेश गायकवाड हे दोघे जण रिक्षा चालवितात. दीपक साळुंखे हा वेल्डर आहे. रवी भिसे चालक असून राहुल लंबाते हा काही काळ हॉटेल चालवत होता. सोन्या सोनटक्के हा त्या सर्वांचा म्होरक्या होता. (वार्ताहर)
सोन्या सोनटक्केच्या खुनाचा घेतला बदला
इंदापूर न्यायालयासमोरच्या चौकात २६ नोव्हेंबर २००६ रोजी रात्री सोन्या सोनटक्के याची हत्या झाली होती. त्याप्रकरणी प्रमुख आरोपी म्हणून धनंजय वाशिंबेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ते या प्रकरणात तीन वर्षे तुरुंगात होते. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र, वाशिंबेकरांना संपवायचेच असे या आरोपींनी ठरवले होते.
इंदापुरातील व्यवहार सुरळीत
बुधवारी (दि. २५) इंदापूरकरांनी बंद पाळल्यानंतर गुरुवारी सकाळी शिवा ग्रुपने शहर बंद पुकारला. वाशिंबेकरांचे खुनी जोपर्यंत सापडत नाहीत, तोपर्यंत बंद ठेवण्याचा त्यांचा निर्धार होता. मात्र, सकाळीच पाच आरोपी पोलिसांनी गजाआड केले. त्याचबरोबर बंद मागे घेण्याचा आदेश पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी दिला. त्यामुळे दुपारी दीडनंतर शहरातले सारे व्यवहार सुरू झाले.
आरोपींना ८ दिवस कोठडी
इंदापूर : धनंजय वाशिंबेकर हत्या प्रकरणातील आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश इंदापूर न्यायालयाने दिले आहेत. आज सायंकाळी चारच्या सुमारास वाशिंबेकर खून प्रकरणातील आरोपी अंकुश मधुकर गायकवाड, दीपक अभिमान साळुंखे, नागेश बापू गायकवाड, राहुल चंद्रकांत लंबाते, रवी वसंत भिसे यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात इंदापूर न्यायालयात आणण्यात आले. सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश पी. एल. घुले यांनी आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.