पुणे : मुत्रपिंड निकामी झाल्याने एक-दोनदा नव्हे तर तब्बल दहा वेळा डायलेसिस, शरीरात रक्त कमी असल्याने आठ पिशव्या रक्त, श्वसनाला त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर अन् त्यातच कोरोनाची लागण, वयही सत्तरीपार... एकामागून एक संकटांचा डोंगर उभा राहत असतानाही त्यावर यशस्वी चढाई करत या सत्तरीतील वॉरियरने कोरोनाला हरविले. मात्र, त्यांना अद्याप घरी सोडण्यात आले नसून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.येरवड्यातील लक्ष्मीनगर मधील एका सत्तरीतील व्यक्तीला दि. ९ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना श्वसनाला त्रास होत होता. तसेच शरीरातील रक्त खुप कमी आणि मुत्रपिंडही निकामी असल्याचे निदान झाले. स्थुलता व उच्च रक्तदाब हे आजारही होतेच. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अॅनिमिया आजारामुळे त्यांना उपचारादरम्यान आठ पिशव्या रक्त द्यावे लागले. तसेच मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांच्या रक्तातील क्रिएटीनचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे त्यांच्यावर हिमोडायलेसिर ही प्रक्रिया १० वेळा करावी लागली. त्यातच श्वसनला त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरद्वारे ऑक्सिजन देण्यात आला. या उपचारांसोबतच कोरोनाचेही उपचार सुरूच होते.दि. २५ व २६ एप्रिल रोजी त्यांची कोरोनाची चाचणी दोनदा निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले. एवढे आजार तसेच सत्तरीपार वय असताना त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिकांनाही आनंद झाला. कोरोनामुक्त झाले असले तरी त्यांना अद्याप घरी सोडण्यात आलेले नाही. त्यांना अन्य इमारतीत अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून डायलेसिसचे उपचार सुरू आहेत.
जिगरबाज! दहावेळा डायलेसिस, आठ पिशव्या रक्त...तरीही कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 18:57 IST
एकामागून एक संकटांचा डोंगर उभा राहत असतानाही त्यावर यशस्वी चढाई करत या सत्तरीतील वॉरियरने कोरोनाला हरविले.
जिगरबाज! दहावेळा डायलेसिस, आठ पिशव्या रक्त...तरीही कोरोनामुक्त
ठळक मुद्देकोरोनामुक्त झाले असले तरी त्यांना अद्याप घरी सोडण्यात आलेले नाही.