राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:46+5:302021-09-06T04:14:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठवाडा व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाला असून, तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे ...

राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठवाडा व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाला असून, तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मध्य भारतासह दक्षिणेतील बहुतांश राज्ये, पश्चिम किनारपट्टीवर सध्या जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पुढील ४ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ७ व ८ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
कोकणातील काणकोन १९०, देवगड ९०, चिपळूण, कल्याण, मालवण ८०, श्रीवर्धन ७०, कणकवली, वैभववाडी ६०, खालापूर, लांजा, म्हसाळा, पेडणे, पोलादपूर, रत्नागिरी ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातील जळगाव १००, माढा ८०, बोदवड ७०, भुसावळ गगनबावडा, जामखेड, यावल ६०, बार्शी, भडगाव, चाळीसगाव, गिरणा धरण, जामनेर, कर्जत, करमाळा, महाबळेश्वर, पाथर्डी ५० मिमी पाऊस झाला.
मराठवाड्यातील शिरूर कासार १५०, अंबड, घनसावंगी १२०, देवणी, रेणापूर, सोयगाव ११०, बीड, भूम १००, औसा, चाकूर ८०, अंबाजोगाई, औंढा नागनाथ, कळमनुरी, पैठण ६०, औरंगाबाद, बदलापूर, हिंगोली, जाफराबाद, जळकोट, कैज, कळंब, खुलताबाद, लातूर, लोहारा, सेनगाव, शिरूर अनंतपाळ, तुळजापूर ५० मिमी पाऊस झाला.
विदर्भातील मंगळूरपीर, मनोरा, मूलचेरा, रिसोड, वाशिम ५० मिमी पावसाची नोंद झाली होती.
घाटमाथ्यावरील सर्वच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी, तर पालघर व नाशिक जिल्ह्यात ८ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ७ व ८ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात ६ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद व अकोला जिल्ह्यात ७ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट दिला आहे.