रायगड, रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST2021-07-22T04:09:03+5:302021-07-22T04:09:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवस कोकणात धुमाकूळ घालत असलेल्या पावसाने आता सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडून पश्चिम महाराष्ट्रात ...

रायगड, रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवस कोकणात धुमाकूळ घालत असलेल्या पावसाने आता सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडून पश्चिम महाराष्ट्रात गेल्या २ दिवसांपासून दमदार हजेरी लावली असून धरण परिसरात जोरदार पाऊस होत आहे. मराठवाड्यात सर्वदर मध्यम ते हलक्या पावसाची बरसात होत असून विदर्भातही सर्वदूर पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे बळीराजासह नागरिक सुखावला आहे.
जुलै महिन्यात कोकणात अधिक पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला होता. तो तंतोतंत खरा ठरला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. जुलै महिन्यात आतापर्यंत त्याचे प्रत्यंतर आले होते. गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. घाटमाथ्यावर गेल्या २४ तासात शिरगाव १९०, कोयना (नवजा) १५, अम्बोने, ताम्हिणी११०, दावडी १००, डुंगरवाडी ९० मिमी पावसाची नोंद झाली होती. महाबळेश्वर १६०, गगनबावडा १५०, इगतपुरी ९०, हर्सूल, राधानगरी ७० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय बहुतांश ठिकाणी मध्यत ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
मराठवाड्यातही सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
बुधवारी दिवसभरात महाबळेश्वर येथे १५२, मुंबई ९१, सांताक्रूझ ५०, अलिबाग ३२, रत्नागिरी २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात सर्वत्र मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे.
राज्यात गुरुवारी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, जालना, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.