विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणी विरोधात आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST2020-11-29T04:04:19+5:302020-11-29T04:04:19+5:30
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात एका विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली असून या घटनेतील दोषींवर तात्काळ ...

विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणी विरोधात आंदोलनाचा इशारा
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात एका विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली असून या घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करावी,अन्यथा तिव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने या घटनेचा धसका घेतला असून विद्यापीठाकडून सुधारित निकाल मिळण्याची तो प्रतिक्षा करत आहे.
पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन व आॅफलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आली.विद्यापीठातर्फे बहुतांश परीक्षांचा निकाल जाहीर झाली असला तरी काही विद्यार्थ्यांच्या निकालात तृटी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी विद्यापीठात तक्रार देण्यासाठी येत आहेत.मात्र,एका विद्यार्थ्याने विद्यापीठाकडे तक्रार दिल्यानंतर तक्रारीचा पाठपुरावा केला.तसेच विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक यांची भेट घेतली.परंतु, संबंधित भेटीचे त्याने व्हिडिओ चित्रिकरण केले. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला मारहाण केली,अशी माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान,विद्यार्थ्याने मारहाण झाल्याचा दावा केला असला तरी त्याने विद्यापीठाविरोधात किंवा संबंधित व्यक्ती विरोधात पोलिसांकडे कोणतीही तक्रार दिली नाही,असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगितले जात आहे.