शंभुलिंग शिवाचार्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:46+5:302021-01-08T04:27:46+5:30

पुणे : “नांदेड येथे वीरशैव लिंगायत धर्माचार्य १०८ वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड व डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर यांना ...

Warning against the attack on Shambhuling Shivacharya | शंभुलिंग शिवाचार्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा

शंभुलिंग शिवाचार्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा

पुणे : “नांदेड येथे वीरशैव लिंगायत धर्माचार्य १०८ वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड व डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर यांना बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी समारंभात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जिवे मारण्याची धमकी दिली. शिष्यांना मारहाण केली. त्यामुळे प्रशासनाने दोषी व्यक्तींना ताबडतोब अटक करून कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना हे निवेदन देण्यात आले.

या वेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ, जितेंद्र अनासपुरे, हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे महानगर संयोजक अतुल सरडे, मल्लिकार्जुन सरडे, डॉ. मुगावे, रवी पाटील, गुरुनाथ हरदरे, पुंडलिक मेथे उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले, “हा प्रकार केवळ वीरशैवांच्या नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्ह असून महाराष्ट्रातील हिंदू संतांच्या हत्या पाहता अत्यंत गंभीर आहे. अविनाश भोसीकर हा गुंड मानसिकतेचा असून, यापूर्वी देखील त्याने अशी कृत्ये करुन हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.”

यापूर्वी नांदेडमध्येच वीरशैव लिंगायत समाजाचेच सद्गुरू निर्वाण पशुपती शिवाचार्य नागठाणकर महाराज यांची हत्या झाली, पालघरमधील हिंदू साधूंचे झालेले हत्याकांडही अजून ताजेच आहे. अशा परिस्थितीत निव्वळ हिंदूद्वेषापोटीच जर काही लोक हिंदू साधू आणि धर्माचार्यांना धमकी देऊन हल्ले करीत असतील तर ही बाब गंभीर आहे. संबंधित व्यक्तींवर त्वरित कारवाई न झाल्यास विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताकडून तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले.

Web Title: Warning against the attack on Shambhuling Shivacharya