वारकऱ्यांनाही दुबार पेरणीची चिंता

By Admin | Updated: July 10, 2015 01:48 IST2015-07-10T01:48:13+5:302015-07-10T01:48:13+5:30

अनेक शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खतासाठी पैसे काढले; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Warkaris also worry about sowing sowing | वारकऱ्यांनाही दुबार पेरणीची चिंता

वारकऱ्यांनाही दुबार पेरणीची चिंता

आळंदी : जवळ पैसे नसतील, तरी सावकाराकडून व्याजाने, जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेकडून किंवा पर्याय म्हणून पतसंस्थेकडून अनेक शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खतासाठी पैसे काढले; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तर, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पावसाचा थेंबही पडला नसल्यामुळे हा भाग कोरडा ठाक असल्याची चिंता आषाढीवारीसाठी आळंदीत दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरुवातीच्या काळात मराठवाड्यासह काही भागांत चांगला पाऊस झाला. ‘भगवंतावर’ भरोसा असलेल्या या शेतकऱ्यांनी पाऊस पडला आहे... तो पुढेही पडेल या भोळ्या आशेने व्याजाने, उसनवारीने पैसे काढून बाजारातील उपलब्ध महागडे बी-बियाणे, खत, औषधी खरेदी केली. मात्र, पेरणीनंतर पावसाने मारलेल्या दडीने हाच शेतकरी हवालदील नव्हे, तर भयभीत झाला आहे. तरीही याची पर्वा न करता संत तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली व विठुरायाच्या भेटीची ओढ त्यांना बसू देत नाही. कितीही संकट आले, तरी निधड्या छातीची ढाल करून संकट झेलण्याची, सहन करण्याची शक्ती बाळगून जगणारा शेतकरी भजन-कीर्तनात, टाळ-मृदंगाच्या गजरात तल्लीन होतोय, हेच वारकरी सांप्रदायाचे वैशिष्ट्य!
माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झालेल्या राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांशी, वारकऱ्यांशी प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी राज्यातील विविध भागांतील पावसाची भयानक वास्तव स्थिती समोर आली. सोलापूर जिल्ह्यातील चंद्रकांत शिवलिंगअप्पा इमडे (रा. कुंभारी), सुरेश बापू भोसले (रा. वेळापूर, ता.माळशिरस), भरत सूर्यकांत धुमाळ (रा.टेंभूर्णी, ता.माढा) यांनी सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाचा थेंबहा पडला नसल्याचे सांगितले. पाऊसच पडला नसल्यामुळे पेरणी झाली नाही. जनावरांना चारा नाही. पिण्याचे पाणी नाही. उन्हाळ्यात सुरू असलेले टँकरचे पाणी आता पावसाळा असल्यामुळे ते बंद करण्यात आले आहेत. काही भागात टँकर तुरळक प्रमाणात चालू आहेत. माळशिरस तालुक्यात उजनी धरण आणि भाटघर धरणाचे पाणी कॅनॉलमध्ये थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याच्याच जिवावर लावलेला थोडा फार ऊस शेतात उभा आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांचा ऊस उभा आहे. ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांचा ऊस उभा वाळून गेला आहे. शेतातील वस्त्यावर पाण्याची कसलीच सोय नाही. त्यामुळे या वस्त्यावर पाण्याची प्रचंड तारांबळ होत आहे. शेतकऱ्यांना सरकार साथ देत नाही. साथ दिली, तर गावातील पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची प्रतिक्रिया माळशिरस तालुक्यातील सुरेश बापू भोसले यांनी दिली.
टेंभुर्णी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या दारातील व शेतातील अनेक जनावरे पाणी व चाऱ्याअभावी सोडून दिल्याचे सांगितले. तर, पंढरपूर तालुक्यात सध्या बोअर, हातपंपाला उपलब्ध असलेल्या पाणीपातळीवर कसे-बसे दिवस काढले जात असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या भागात मृगाचा पाऊस बऱ्यापैकी, तर काही भागात चांगला पाऊस पडला. तो पुढेही पडेल, या आशेवर उन्हा-तान्हात मशागत केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, थोडीशी वाढ झालेल्या या पिकांना पाऊसच नसल्याने ती वाळली आहेत. तर, काहींची वाळण्याच्या प्रक्रियेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उत्तमराव दादा पाटील उकले, रोहिदास मल्हारी वानखेडे या शेतकऱ्यांनी सांगितले, की पेरणीच्या वेळी पाऊस झाला, मात्र त्यानंतर पाऊसच नाही. त्यामुळे पिके वाळली आहेत. (वार्ताहर)

>  जून महिना संपला, तरी सोलापूर जिह्यात पावसाचा थेंब नाही. पिण्याचे पाणी जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करून देणे कठीण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दावणीची जनावरे मोकळी सोडून दिली आहेत.
>  मराठवाड्यात पहिल्या पावसाच्या जिवावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर पाऊस पडला नाही त्यामुळे कर्जात अडकलेल्या या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे भयानक संकट.
>  सांगली, सातारा, जिल्ह्यातही पावसाने दडी मारल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; मात्र फक्त कोल्हापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.
>  भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे विविध भागांतून आलेल्या वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊलीला घातले.

>  औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या पावसाच्या आधारावर कपाशी, मका, बाजरी, मूग, तूर याची पेरणी करण्यात आली. मात्र, पावसामुळे ही पिके वाळली. पिण्याचे पाणी सध्या मिळत असले, तरी जनावरांना महागडा व न परवडणारा चारा घेऊन घालावा लागत असल्याचे अर्जुन चौधरी, भाऊसाहेब चौधरी, दिलीप वाघमारे, गणेश बोर्डे या शेतकऱ्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील लातूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, औसा, निलगा, शिरूर अनंतपाळ, देवळी या तालुक्यात पहिला पाऊस पडल्याने जवळपास ६५ ते ७० टक्के पेरण्या झाल्या, तर लातूर तालुक्यात पेरणीच झाली नाही, अशी माहिती या भागातील प्रल्हाद देवराम रोळे (रा. हालसी, ता. निलंगा), हरिश्चंद्र जंगमवाड (रा. चाकूर) यांनी दिली.
>  उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांत कमी प्रमाणात पाऊस झाला. या पावसात चांगल्या जमिनीत काही प्रमाणात पेरणी झाली, तर काही भागांत पेरणीच झाली नसल्याचे सांगण्यात आले. नांदेड, परभणी, हिंगोली या भागातही हीच परिस्थिती असल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. सांगली, सातारा भागातही हीच परिस्थिती आहे.

Web Title: Warkaris also worry about sowing sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.