नियंत्रणाला वॉर्डन; वसुलीला पोलीस !
By Admin | Updated: July 7, 2016 03:36 IST2016-07-07T03:36:49+5:302016-07-07T03:36:49+5:30
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहनांची संख्या वाढली आहे. त्याबरोबर अपघातही वाढले आहेत. नियमांचे उल्लंघन हेच अपघाताचं मुख्य कारण आहे. पण, याकडे वाहनचालकांचं दुर्लक्ष होतं.

नियंत्रणाला वॉर्डन; वसुलीला पोलीस !
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहनांची संख्या वाढली आहे. त्याबरोबर अपघातही वाढले आहेत. नियमांचे उल्लंघन हेच अपघाताचं मुख्य कारण आहे. पण, याकडे वाहनचालकांचं दुर्लक्ष होतं. तर वाहतूक पोलीसही त्याकडे लक्ष देत नाहीत. बहुतांशी चौकामध्ये वाहतूक पोलीस नसतात. तर अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस गप्पा मारत बसतात आणि वाहतूक नियमनाची जबाबदारी वॉर्डनवर सोपवितात. दंडाच्या पावत्या न फाडता दंडाची आकारणी करत असल्याचेही दिसून आहे. असे चित्र शहरातील बहुतांश चौकात ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.
पावत्या फाडण्यासाठीच पोलीस
वेळ : दु. ११ स्थळ : शिवाजीमहाराज चौक, चिंचवड
वाहतूक पोलीस वॉर्डनसह मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याला जाण्याच्या दिशेने उभे होते. केएसबी चौकातून चिंचवडकडे येणाऱ्या रस्त्यावर वन वे असल्याने वाहतुकीस बंदी आहे. यामुळे याच ठिकाणी चौकाच्या कॉर्नरला उभे राहून वाहतूक पोलीस अधिकारी नो एन्ट्रीतून येणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत असतात. प्रत्येक नो एन्ट्रीतून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनाकडून १०० रुपये दंड आकारला जातो. वॉर्डन हात दाखवून वाहन थांबवतो. वाहतूक पोलीस अधिकारी लगेच पावती फाडतात. असा रोजचा दिनक्रम वाहतूक पोलिसांचा आहे.
वेळ : सकाळी ११.३० स्थळ : महावीर चौक
दोन वाहतूक पोलीस अधिकारी उभे होते. चिंचवडगावातून येताना डाव्या बाजूला वळणाऱ्या वाहनाला थांबवून त्यांच्याकडून दंड आकारण्याचे काम त्यांचे सुरू होते. चिंचवडगावातून महामार्गावर येणाऱ्या वाहनांना डाव्या बाजूला वळण्यासाठी परवानगी नाही. यामुळे या चौकात अनेक वाहनांकडून पावत्या फाडल्या जातात. चौकाच्या मध्यभागी उभे न राहता बाजूला उभे राहून वाहतूक पोलीस केवळ पावत्या फाडण्यासाठी येथे उभे राहतात. वाहतूक पोलिसांची या ठिकाणी उभे राहण्याची जागा कधीच बदलत नाही.
वाहतूक पोलिसांवर दडपण
वेळ : दुपारी १२ स्थळ : भक्ती-शक्ती चौक
वाहतूक पोलिसांनी मालवाहतूक टेम्पोस अडविले. वाहनचालकाकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. त्याच्याकडे गाडीचा विमा नसल्याचे वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास आले. लगेचच पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. दंडाची पावती घेण्यास टाळाटाळ करीत वाहनचालकाने गाडीमालकाला फोन करून तो पोलिसाकडे देण्याचा प्रयत्न केला. परंतु दंड भरावाच लागेल, असे खडे बोल संबंधित पोलिसाने चालकाला सुनावल्यानंतर नरमाईची भूमिका घेतली.
पावत्या न देताच सोडली वाहने
वेळ : सकाळी ११.१५ स्थळ : काळाखडक, भूमकर चौक
काळखडक भूमकर पुलाजवळ काही प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होती. मात्र, या वाहतुकीचे नियमन एक पोलीस कर्मचारी आणि वॉर्डन करीत असल्याचे दिसले. तर अन्य दोन कर्मचारी चौकातील एका कोपऱ्यात असलेल्या टपरीच्या शेडखाली निवांत बसल्याचे दिसले.
वेळ : दु. १ स्थळ : संत नामदेवमहाराज चौक, वाल्हेकरवाडी
कोपऱ्यावर दोन वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करण्यापेक्षा धरपकड करण्यात मग्न होते. दोघांपैकी एक जण दुचाकी आणि अन्य वाहने अडवून साइडला घेण्याचे काम करीत होता, तर दुसरा दंड सांगण्याचे काम करीत त्याने काहींना तडजोडीवर पावती ना करता सोडले.
वेळ : सायं. ६.२५ स्थळ : हिंजवडी चौक
पाऊस सुरू असताना हिंजवडीच्या दिशेला दोन वॉर्डन आणि एक पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियमन करीत होते. तर वाहतूक विभागाला नव्याने दिलेल्या खाकी पोलिसांपैकी एक जण पुलाच्या आसऱ्याला निवांत थांबल्याचे दिसला.
मोहीम पोलिसांची; त्रास चालकांना
निगडी : निगडी प्राधिकरण येथील पेठ क्र. २६ बिग इंडिया चौकात निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी व चारचाकी संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनधारकाचा वाहन क्रमांक, इंजिन नंबर , लायसन नंबर अशा विविध प्रकारची तपासणी करण्यात आली . या मोहिमेंतर्गत दररोज २०० वाहनांची तपासणी होते . या वाहन तपासणी मोहिमेमुळे चोरीला गेलेली वाहने सापडण्यास मदत होते. पण त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
काळेवाडी : पिंपरी ते काळेवाडी फाटा रस्त्यावरील तापकीर चौक , रहाटणी फाटा व काळेवाडी फाट्यावर दररोज वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. परंतु, त्यांच्याकडून आपल्या सुरळीत वाहतूक या कर्तव्याऐवजी वसुलीकडेच अधिक लक्ष असते.
वाहतूक पोलीस गायब
वेळ : दु. १ स्थळ : (कै.) मधुकर पवळे उड्डाणपूल
या ठिकाणी वाहतूक पोलीस नव्हते. वाहनचालक बिनधास्तपणे वाहतूक नियमांचे उल्लघंन करत होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी वाहतूक पोलीस फिरकले नाहीत. वाहने धडकण्याचे प्रकार घडत होते. किरकोळ अपघाताच्याही घटना घडल्या. पण, वाहतूक पोलीस या ठिकाणी नव्हते. आकुर्डी येथील खंडोबा माळ सिग्नलवरही वाहतूक पोलीस नव्हते. त्यामुळे तेथील वाहतूकही रामभरोसेच सुरू होती.
वाहतूक पोलीस कशासाठी?
रहाटणी : अनेक चौकांत वॉर्डन वाहन अडवितो. परवाना तपासणे, पीयूसी तपासणी करून उपस्थित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या स्वाधीन करतो. वॉर्डन चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी आहेत, की ते पोलिसांचे एजंट आहेत. असा प्रकार शिवार चौक, साई चौक,काळेवाडी फाटा, रहाटणी फाटा, तापकीर चौकात निदर्शनास येत आहे.
स्थळ : साई चौक
शिवार चौकाकडून जाणाऱ्या वाहनांना पुण्याकडे जाण्यासाठी लेफ्ट फ्री करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक चालक वळणावर वेग मर्यादित ठेवून वाहन चालवितात. मात्र याच वळणावर वाहतूक पोलीस उभे होते. काळ्या काचा, सीट बेल्ट न लावणे अशी कारणे पुढे करून चालत्या वाहनांना अडविले जात होते. वाहनचालकांना वाटेल तो दंड सांगितला जात होता. तडजोड करून काही वाहनचालकांना सोडले जाते, तर काही वाहनचालकांवर कारवाई केली जाते. अशीच परिस्थिती शिवार चौक,तापकीर चौक, रहाटणी फाटा,काळेवाडी फाटा इथे निदर्शनास आली. दुपारी एकनंतर एकाही चौकात वाहतूक पोलीस दिसून आले नाहीत.
पांढरी वर्दी गप्पांत दंग
वेळ : दुपारी ११.४५ स्थळ : डांगे चौक
दोन वाहतूक पोलीस दुचाकीवर बसूनच शिट्टी वाजवून वाहतुकीचे नियमन करीत होते. शिट्टी वाजल्यानंतर हो दोघे पोलीस एकमेकांशी गप्पादेखील करीत होते. त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांकडे त्यांचे लक्ष नव्हते. डांगे चौकातील चिंचवडगावाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेला उड्डाणपुलाच्या खाली दोन वाहतूक पोलीस दुचाकीवर बसून गप्पा मारीत होते, तर एक पोलीस बीआरटीच्या थांब्याजवळ, तर दुसरे चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत करीत होते.
-------------------------------------
टीम लोकमत : शिवप्रसाद डांगे, अतुल क्षीरसागर, सचिन देव, नीलेश जंगम, शहाजी लाखे, बेलाजी पात्रे, औदुंबर पांडुळे