प्रभाग समिती बैठकीला दांडी

By Admin | Updated: July 3, 2015 00:22 IST2015-07-03T00:22:03+5:302015-07-03T00:22:03+5:30

महापालिकेच्या क्षेत्रीय प्रभागांच्या सभेसाठी बहुतांश नगरसदस्य काणाडोळा करीत असून, प्रत्येक महिन्याची सभा घेण्यासाठी प्रभागाध्यक्षांना प्रत्येक नगरसेवकास प्रत्यक्ष

Ward Committee meeting Dandi | प्रभाग समिती बैठकीला दांडी

प्रभाग समिती बैठकीला दांडी

भोसरी : महापालिकेच्या क्षेत्रीय प्रभागांच्या सभेसाठी बहुतांश नगरसदस्य काणाडोळा करीत असून, प्रत्येक महिन्याची सभा घेण्यासाठी प्रभागाध्यक्षांना प्रत्येक नगरसेवकास प्रत्यक्ष विनवणी करावी लागत असल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही प्रत्येक सभेचा कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे दोन-चार नगरसेवकांच्या साक्षीने सभा आटोपण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याचे चित्र ई क्षेत्रीय प्रभागात दिसत आहे. खासगी कामामुळे वेळ नाही किंवा क्षेत्रीय प्रभाग समितीच्या सभेला महत्त्वच नसल्याची भावना नगरसेवकांमध्ये असून, प्रत्येक सभेला वाटण्याच्या अक्षदा लावण्याचे प्रकार सुरू आहेत.
महापालिकेचे पूर्वीचे चार व नवीन दोन असे सहा क्षेत्रीय प्रभाग असून, या प्रभागात नागरिकांच्या मूलभूत प्रश्न ताबडतोब सुटावेत व १० लाख रुपयांपर्यंतची छोटी छोटी कामे त्वरित व्हावीत यासाठी प्रभाग समिती काम करीत असते. पूर्वीच्या चार प्रभागावर कामाचा मोठा ताण पडत असल्याने गेल्या वर्षी दोन नवीन प्रभाग सुरू करण्यात आले. मात्र, हे प्रभाग फक्त नावालाच आहेत अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
प्रभाग क्षेत्रात कामांची माहिती व आढावा घेण्यासाठी दर महिन्याला सर्व नगरसेवक व सर्व विभाग प्रमुखांची बैठक प्रभाग स्तरावर असते. बैठकीत कामांचा व नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला जातो. मात्र, नवीन झालेल्या भोसरीतील ई प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील सभा फक्त नावालाच होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. या प्रभागामध्ये भोसरी, मोशीसह चऱ्होलीचा समावेश आहे. एक आमदार, एक माजी महापौर व मोठमोठे पदाधिकारी येथे नगरसेवक आहेत. त्यामुळे कदाचित येथील सदस्यांना प्रभागसभेसारख्या छोट्या सभेला जाणे गरजेचे वाटत नसावे, अशी चर्चा आहे.
जुलै महिन्याची सभा बुधवारी झाली ती अवघ्या सहा सदस्यांसह. वेळीच याबाबतची दखल पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही, तर काही दिवसांत मासिक सभा बंदच करावी लागेल. या सभेला प्रभागाध्यक्ष नगरसेविका विनया तापकीर, नितीन लांडगे, धनंजय आल्हाट, आशा सुपे, अनुराधा गोफणे व सुरेख गव्हाणे व प्रभाग अधिकारी आशादेवी दुरगुडे उपस्थित होत्या. (वार्ताहर)

Web Title: Ward Committee meeting Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.