अधिकाऱ्यांना प्रतीक्षा माघारीची
By Admin | Updated: September 30, 2014 23:53 IST2014-09-30T23:53:43+5:302014-09-30T23:53:43+5:30
दोन यंत्रांची भीती : कामकाजावर पडणार ताण

अधिकाऱ्यांना प्रतीक्षा माघारीची
नाशिक : विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीत झालेल्या फाटाफुटीमुळे अगोदरच एकाऐवजी दोन-दोन उमेदवार रिंगणात उतरून निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे असताना व त्यात भरमसाठ अपक्षांनी उड्या मारलेल्या असल्याने उमेदवारांच्या वाढत्या संख्येची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. पंधरापेक्षा अधिक उमेदवार असल्यास दोन मतदान यंत्रे लावावी लागणार असल्याने प्रशासकीय कामकाज दुपटीने वाढेल. त्यापेक्षा अधिकाधिक उमेदवारांची माघार व्हावी याची प्रतीक्षा अधिकाऱ्यांना लागून आहे.
जिल्ह्यातील पंधरा जागांसाठी ३२३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातही देवळालीसारख्या मतदारसंघात ३९, नाशिक पश्चिममध्ये २३, नाशिक पूर्वमध्ये २२, बागलाणला २४, नांदगावला ३२, इगतपुरीत २२ अशाप्रकारे जवळपास पंधराहून अधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काही मतदारसंघांत एकाच यंत्रात नावे समाविष्ट होऊ शकतील इतकेच उमेदवार असल्याने त्याबाबत चिंता नसली, तरी जेथे पंधराच्या पुढे मतदारांची संख्या गेली त्याठिकाणी मात्र निवडणूकप्रक्रिया राबविताना कामकाजाचा ताण वाढणार आहे.
या निवडणुकीतून माघार घेण्याची अंतिम मुदत बुधवार, दि. १ आॅक्टोबर असली, तरी सोमवारपासूनच उमेदवार माघार घेऊ शकतात; परंतु दोन दिवसांत अगदीच बोटावर मोजण्याइतक्याच उमेदवारांनी माघार घेतल्याने बुधवारी हीच परिस्थिती राहणार का, या प्रश्नाने निवडणूक अधिकारी परेशान झाले आहेत. एक उमेदवार वाढला तर त्याच्याबरोबर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्यामुळे त्यासाठी कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव व मतदान यंत्रांचा वापरही वाढणार आहे. (प्रतिनिधी)