तोडग्यासाठी आता प्रतीक्षा
By Admin | Updated: August 11, 2014 03:51 IST2014-08-11T03:51:37+5:302014-08-11T03:51:37+5:30
कचराकोंडी सोडविण्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी आणि शहरातील आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता

तोडग्यासाठी आता प्रतीक्षा
पुणे : कचराकोंडी सोडविण्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी आणि शहरातील आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यांनी वेळच न दिल्याने या समस्येवर आजही तोडगा निघालेला नाही.
त्यामुळे शहरातील कचराकोंडी कायम असून, गेल्या चार दिवसांपासून शहरात तब्बल साडेतीन हजार टन कचरा पडून आहे. महापालिका पदाधिकारी, तसेच शहरातील आमदारांना बैठकीसाठी किमान अर्ध्या तासाचा वेळ द्यावा, यासाठी महापौर कार्यालय, तसेच जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याचे महापौर चंचला कोद्रे यांनी सांगितले.
कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा, शहराच्या चार दिशांना कचरा डेपो सुरू करावेत, या मागणीसाठी उरुळी देवाची व फुरसुंगी येथील नागरिकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यावर उपाययोजनेसाठी महापौरांनी शुक्रवारी सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलाविली होती. परिसरात बंद पडलेल्या दगडखाणी कचरा टाकण्यासाठी पालिकेस द्याव्यात, या मागणीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे वेळ मागितली होती. (प्रतिनिधी)