कोरोना लसीकरणानंतर अर्धा तास थांबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:13+5:302021-06-22T04:09:13+5:30
पुणे : कोरोना लसीकरणानंतर अनेक जण तातडीने केंद्राबाहेर पडतात. पण, असे करणे धोक्याचे ठरू शकते. काही जणांना लस घेतल्यावर ...

कोरोना लसीकरणानंतर अर्धा तास थांबा!
पुणे : कोरोना लसीकरणानंतर अनेक जण तातडीने केंद्राबाहेर पडतात. पण, असे करणे धोक्याचे ठरू शकते. काही जणांना लस घेतल्यावर लगेच चक्कर येऊन शुद्ध हरपणे, हार्ट रेट वाढणे, श्वसनाचा वेग वाढणे, तीव्र अॅलर्जी असे त्रास होऊ शकतात. त्रासाची तीव्रता वाढू नये आणि वाढल्यास त्वरित औषधोपचार करता यावेत, यासाठी अर्धा तास केंद्रावरच थांबण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. लस घेतल्यानंतर तीव्र स्वरूपाचा त्रास होण्याचे प्रमाण ०.००५ टक्के इतकेच आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अर्धा तास वाट पाहावी, असे आवाहन लसीकरण केंद्रांवर केले जात आहे.
लसीकरण केंद्रांवर नावनोंदणी केली जाते, प्रत्यक्ष लसीकरण खोलीत लस घेतल्यावर अर्धा तास निरीक्षण खोलीमध्ये थांबण्यास सांगितले जाते. लस घेतल्यावर काही त्रास होत असल्यास निरीक्षण केले जाते. अर्धा तासाच्या कालावधीत पुरळ उठणे, ताप येणे, चक्कर येणे, ॉलर्जी येणे, रक्तदाब वाढणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार केले जाते. असा त्रास जाणवल्यास एईएफआय (अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन) किट तयार ठेवली जाते. यामध्ये आयत्या वेळी द्यायची इंजेक्शन, औषधे यांचा समावेश असतो.
लसीमुळे ॲलर्जी आल्याने रक्तसंक्रमणात बाधा निर्माण होऊन डोकेदुखी, पुरळ उठणे, लाल चट्टे पडणे, चक्कर येणे अशी लक्षणे आढळू शकतात. ॲनाफिलॅक्सिसमुळे रक्तपेशींमधील रसायने वाढतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होतो. हृदयविकाराच्या तक्रारी असलेल्यांना ॲनाफिलॅक्सिसचा धोका अधिक असतो. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अर्धा तास वाट पाहण्याचा सल्ला वैद्यकतज्ज्ञांकडून दिला जातो.
-------
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी 142936 92662
अत्यावश्यक सेवा 214606 89241
18-44 वयोगट 450770 21478
45-60 916631 171510
60 वरील 819966 301211
------
लस घेतल्यानंतर दुष्परिणाम होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. चक्कर येणे, शुद्ध हरपणे, श्वसनाचा वेग वाढणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, अॅलर्जी होणे असा त्रास जाणवू शकतो. यासाठी प्रत्येक केंद्रावर एएफईआय किट तयार ठेवली जाते. यामध्ये इंजेक्शन, औषधे यांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत कशा प्रकारे उपचार करावेत, याचे प्रशिक्षण डॉक्टर आणि नर्सना दिलेले असते. एएफईआयचे प्रमाण ०.००५ टक्के इतकेच असले तरीही खबरदारीचा उपाय म्हणून लस घेतल्यावर घरी जाण्याची घाई न करता अर्धा तास वाट पाहावी.
- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, आरोग्य विभाग
----
लस हेच औषध
लसींची सुरक्षितता तपासण्यासाठी प्रयोगशाळेत विविध चाचण्या केल्या जातात. त्यानंतर मानवी चाचण्या करून सुरक्षितता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता तपासली जाते. लसीनंतर त्रास झाल्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याचाच अर्थ लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोरोनाची साथ रोखण्यासाठी लस हेच एकमेव परिणामकारक औषध आहे. त्यामुळे लसीकरणाशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी आवर्जून पुढे यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.