मतदार यात्रेतून येणार का मतदानाला?
By Admin | Updated: February 12, 2017 04:50 IST2017-02-12T04:50:08+5:302017-02-12T04:50:08+5:30
पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबामहाराजांच्या १० दिवसांच्या यात्रेचा तालुक्यातील पश्चिम भागातील निवडणुकीवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे

मतदार यात्रेतून येणार का मतदानाला?
गराडे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबामहाराजांच्या १० दिवसांच्या यात्रेचा तालुक्यातील पश्चिम भागातील निवडणुकीवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, प्रचारात उमेदवारांना लोक गावात
सापडणे मुश्कील असतानाच यात्रेच्या मुख्य व शेवटच्या मारामारीच्या दिवशीच (दि. २१) मतदान
आहे. त्यामुळे मतदानाची
टक्केवारी घटण्याची दाट
शक्यता आहे.
दिवे-गराडे जिल्हा परिषद गटाचा निम्मा भाग व गराडे पंचायत समिती गण या यात्रेला जाणाऱ्या गावांमध्ये समाविष्ट होतो. त्यामध्ये गराडे, भिवरी, चांबळी, बोपगाव, सोमुर्डी, दरेवाडी, वारवडी, थापेवाडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी, पठारवाडी, आस्करवाडी, विठ्ठलवाडी, कोडीत बुद्रुक, कोडीत खुर्द या गावांचा समावेश आहे.
विशेषत: कोडीत बुद्रुक, कोडीत खुर्द ही गावे म्हस्कोबामहाराजांच्या मंदिर परिसरातील आहेत. येथील श्रीनाथभक्त मोठ्या संख्येने यात्रेला जातात. प्रामुख्याने २१ फेब्रुवारी या मारामारीच्या दिवशी (लालभडक गुलालाचे शिंपण) या दोन्ही गावांतील ९५ टक्के लोक श्रीक्षेत्र वीरला जातात. त्यामुळे मारामारीच्या दिवशी श्रीक्षेत्र वीर ते श्रीक्षेत्र कोडीत, असा तब्बल ३५ ते ३८ कि.मी.चा प्रवास करून मतदानाचा हक्क कोण-कोण बजावणार, अशी शंका या भागात चर्चेत आहे. मारामारी दुपारी २ ते ३च्या दरम्यान संपते. मारामारी उरकल्यावर किती श्रीनाथभक्त मतदानस्थळी वेगाने पोहोचून मतदान करणार, याची सर्वपक्षीय उमेदवारांना भीतियुक्त चिंता लागली आहे.
यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वत्र चौरंगी व पंचरंगी अटीतटीच्या लढती होत आहेत. त्यामुळे उमेदवार १०० ते ५०० मतांच्याच फरकाने निवडून येण्याची शक्यता आहे. त्यातच प्रचारासाठी खूपच कमी अवधी शिल्लक राहिल्याने उमेदवार व
त्यांच्या कार्यकर्त्यांची मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ उडत
असून, दमछाक होत आहे.
त्यातच श्रीक्षेत्र वीर
येथील म्हस्कोबामहाराज यात्रेमुळे यात्राकाळात मतदार मतदानाला कसा प्रतिसाद देतात, यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
श्रीक्षेत्र वीर येथे देवाचा गुलाल अंगावर घेतल्याशिवाय यात्रा संपली, असे मानत नाहीत. ते तेथे उपस्थित राहून भक्तिभाव जोपासतात. वीर-कोडीत अंतर मोठे आहे. मारामारी झाल्यानंतर श्रीनाथभक्त मतदानाचा हक्क स्वत:च्या वाहनांनी वेगाने येऊन किती प्रमाणात बजावतात, पक्षाचे कार्यकर्ते व इतर लोक त्यांना कशी मदत करणार, यावर मतदानाची टक्केवारी अवलंबून आहे.
- निवृत्ती जरांडे, उपसरपंच, कोडीत