सासवड: पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील निराधार लहान मुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या सार्थक अनाथ आश्रमात कोरोना या रोगाचा शिरकाव झाला होता. आश्रमातील २१ मुले कोरोनाबाधित झाली होती. ही सर्व मुले ८ ते ९ या वयोगटांतील असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. या सर्वांना तातडीने सासवड - जेजुरी रस्त्यावरील आनंदी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. या सर्व कोविडग्रस्त मुलांची प्रकृती स्थिर असून बालरोगतज्ज्ञ डाॅक्टर परिस्थिती वर लक्ष ठेवून आहेत.
‘लोकमत’मध्ये या घटनेचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्याने याची दखल घेऊन आरोग्य विभाग, तसेच पुणे जिल्ह्यचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी ग्रामीण संस्था संचलित आनंदी जम्बो कोविड सेंटर खळद येथे भेट दिली. आंबळे येथील सार्थक सेवा संघाच्या वसतिगृहातील अनाथ २१ मुले आणि पर्यवेक्षिका सपना क्षीरसागर असे २२ जण एकाच वेळी कोरोनाग्रस्त झाले होते. वसतिगृह व्यवस्थापनाने संपर्क करताच आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांनी तातडीने सर्वांना खळद येथे कोविड सेंटरला दाखल करून घेतले. सासवडचे बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक बांदेकर यांच्या निरीक्षणात गेले पाच सहा दिवस मुले उपचार घेत आहेत. याच बातमीची दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी आज कोविड सेंटरला भेट देऊन सर्व मुले आणि रुग्णांची विचारपूस करून उपचाराची माहिती घेतली. आनंदी कोविड सेंटरच्या सुरू असलेल्या रुग्णसेवेचा संपूर्ण आढावा घेत मिलिंद मोहिते यांनी समाधान व्यक्त केले. डॉक्टर आणि परिचारिका यांनाही त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. या वेळी ग्रामीण संस्था संचालक मुन्ना शिंदे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष सागर मोकाशी, शिक्षकनेते संदीप जगताप, डॉक्टर मयूर अग्रवाल हे उपस्थित होते.
————————————————————————————————————