ग्रामस्थांनी रस्ता खोदून केला बंद
By Admin | Updated: November 24, 2015 00:52 IST2015-11-24T00:52:41+5:302015-11-24T00:52:41+5:30
चार महिन्यापासून उर्से ग्रामपंचायतीजवळच पडलेल्या खडीमुळे येथील १० ते १२ जण जखमी झाल्याने आणि वारंवार

ग्रामस्थांनी रस्ता खोदून केला बंद
उर्से : चार महिन्यापासून उर्से ग्रामपंचायतीजवळच पडलेल्या खडीमुळे येथील १० ते १२ जण जखमी झाल्याने आणि वारंवार तक्रार करूनही खडी उचलली जात नसल्याने रस्ताच खोदून बंद करण्याची धमकी ग्रामस्थांनी महिन्यापूर्वी दिली होती. तरीही दुर्लक्ष केल्यामुळे अखेर सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी रस्ता जेसीबीच्या साह्याने उकरून बंद केल्याने येथील कंपन्या व ग्रामस्थांची चांगलीच गैरसोय झाली आहे.
याबाबत ‘लोकमत’ने छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध केली होती. चार-पाच महिन्यांपूर्वी महिंद्रा हिनोदय व जयहिंद कंपनीसमोरील रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, कामानंतर येथील मुख्य रस्त्यावर पडलेली दगडी खडी ये-जा करणारे वाहनचालक, दुकानदार, रहिवासी व लहान मुले यांच्यासाठी धोकादायक ठरत होती. कंपनीत कामगारांना नेणारी मोठी गाडी, ट्रक, अती अवजड वाहने या खडीवरून जाताना चाकात अडकून दगड गोफणीतून सुटल्यासारखे उडत होते. त्यामुळे आतापर्यंत दहा ते बारा जणांना मोठी इजा झाली. दुकानांच्या काउंटरच्या काचाही फुटल्या. या ठिकाणी लहान मुलेही खेळत असतात. त्यांनाही दगड लागण्याचा धोका आहे. अपघाती घटना घडत असतानाही ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचा आरोप होत होता. पडलेली खडी कंपनीने, ग्रामपंचायतीने का रस्ते विकास महामंडळाने उचलायची या वादात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जावे लागत होते. गावातील वायरमन राजू गायकवाड यांना येथील दगड उडून लागल्याने मोठी जखम डोळ्याला झाली. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील खडी तानाजी कारके यांच्या घरात पाण्यासह वाहून गेल्याने घरात नुकसान झाले. रस्ताच बंद करण्यात आल्याने कंपन्यांची वाहतूक विस्कळीत झाली. (वार्ताहर)