गावकारभाऱ्यांना नगर परिषदेत नाकारले
By Admin | Updated: April 24, 2015 03:32 IST2015-04-24T03:32:27+5:302015-04-24T03:32:27+5:30
राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही.

गावकारभाऱ्यांना नगर परिषदेत नाकारले
राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत
मिळाले नाही. १८ जागांपैकी ७ भाजपाला, २ शिवसेनेला आणि तब्बल ९ जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. पाच-सहा अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असणारे आहेत. अपवाद वगळता सर्व चेहरे नवीन आहेत. विशेष म्हणजे मावळत्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना मतदारांनी नाकारले. किशोर ओसवाल हे एकमेव सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
काही अपक्षांच्या मदतीने भाजपा नगर परिषदेच्या सत्तेवर येईल असा कयास सध्या राजकीय वर्तुळात लावला जात आहे.
अतिशय उत्साहाच्या आणि चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. यामध्ये काही माजी ग्रामपंचायत सदस्य पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक १७ मधून किशोर ओसवाल हे एकमेव मावळत्या ग्रामपंचायतीतील सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. माजी सरपंच कैलास सांडभोर, प्रदीप कासवा, माजी उपसरपंच रेवणनाथ थिगळे, बाळासाहेब कहाणे, माजी सदस्य वैभव घुमटकर, कांतिलाल गुगळे, माजी सदस्या ऊर्मिला सांडभोर, सखुबाई डोळस, उमा वाघ, मनीषा सांडभोर, सुनीता घुमटकर, लीलाबाई थिगळे, राक्षेवाडीच्या माजी सरपंच विद्या राक्षे असे पूर्वी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य राहिलेले दिग्गज पराभूत झाले.
आज सकाळी ८ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रत्यक्षात साडेनऊ वाजता मतदान यंत्रे मतमोजणीसाठी टेबलवर घेतली. अवघ्या पाच मिनिटांत ९ प्रभागांचा निकाल समजला. त्यानंतर १५ मिनिटांत पुढच्या ९ प्रभागांची मतमोजणी झाली व सर्व निकाल बाहेर आले.
सकाळी दहाच्या
सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी हिंमतराव खराडे यांनी सर्व
निकाल जाहीर केले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके उडविले तसेच गुलाल
आणि भंडारा उधळून आनंद साजरा केला. काहींनी विजयी मिरवणुका काढल्या.
निकालानंतर कोणाची
सत्ता येणार याच्या चर्चा सुरू
झाल्या. भाजपा आणि काही
अपक्ष; भाजपा आणि शिवसेना; अपक्ष आणि शिवसेना अशी
गणिते मांडली जाऊ लागली.
पाच वर्षांचा कार्यकाल
वाटून घेऊन समीकरणे बसविली जाऊ शकतात, अशीही चर्चा होत आहे. (वार्ताहर)