हौदात गणेशमूर्ती विसर्जनाचा विक्रम
By Admin | Updated: September 29, 2015 01:55 IST2015-09-29T01:55:50+5:302015-09-29T01:55:50+5:30
दुष्काळाचे सावट... पाणीकपातीचा करावा लागणारा सामना... मानाच्या पाच गणेश मंडळांनी यंदा विसर्जनाचा पायंडा बदलत हौदातच मूर्ती विसर्जित करण्याचा घेतलेला निर्णय... आणि पालिकेने केलेल्या उपाययोजना

हौदात गणेशमूर्ती विसर्जनाचा विक्रम
पुणे : दुष्काळाचे सावट... पाणीकपातीचा करावा लागणारा सामना... मानाच्या पाच गणेश मंडळांनी यंदा विसर्जनाचा पायंडा बदलत हौदातच मूर्ती विसर्जित करण्याचा घेतलेला निर्णय... आणि पालिकेने केलेल्या उपाययोजना... याच्या परिणामांमुळे शेवटच्या दिवशी हौदांमध्ये मूर्ती विसर्जित करण्याला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विसर्जित झालेल्या एकूण २ लाख ५९ हजार ८२७ गणेशमूर्तींपैकी हौदात ७९ हजार १५७, तर टाक्यांमध्ये ५३ हजार २४१ मूर्तींचे रविवारी विसर्जन झाले. यामुळे यंदाची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक ही खऱ्या अर्थाने आदर्शवत ठरली.
यंदा राज्यावर पावसाअभावी दुष्काळाचे संकट आहे. ऐन गणेशोत्सवात पाणीकपातीचे संकट पुणेकरांवर आले आहे. ही सर्व गंभीर परिस्थिती पाहता मानाच्या पाच गणेश मंडळांनी घाटावरील पाण्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन न करता हौदामध्ये विसर्जन करण्याचा निर्णय घेऊन यंदाच्या गणेशविसर्जन मिरवणुकीत नवीन पायंडा रचला. त्याचेच काहीसे अनुकरण इतर मंडळांसह गणेशभक्तांनीही केले. यातच पाणीकपातीमुळे पालिकेनेही पाणी सोडण्याबाबत हात आखडता घेतला होता. त्यामुळे यंदा हौदामध्ये गणेशमूर्ती विसर्जित करण्याला पुणेकरांनी काहीशी पसंती दिली. गतवर्षीपेक्षा यंदा हे प्रमाण विक्रमी होते. शहरातील विविध घाटांवर महापालिकेतर्फे हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळातही हौदात मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. या कालावधीत एकूण ३ लाख ७७ हजार १५ विसर्जित झालेल्या गणेशमूर्तींपैकी हौदामध्ये १ लाख १३ हजार ९२७, तर टाकीमध्ये ८० हजार २६७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कॅनॉलमध्ये ३५ हजार ३३२, नदीपात्रामध्ये १ लाख १९ हजार १०२ मूर्ती, तर विहिरींमध्ये ४ हजार २३६ मूर्ती विसर्जित झाल्या.
------
मूर्तिदान करावे किंवा नाही, याबद्दल अनेक मत-मतांतरे आहेत. मात्र, गेल्या २ वर्षांंमध्ये सामाजिक मानसिकतेत बदल होत आहे. नदीमध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींचे करण्यात येणारे विसर्जन...विद्रूप होणाऱ्या मूर्ती... जलप्रदूषण याविषयीची जनजागरुकता वाढल्यामुळे गणेशमूर्ती विसर्जित न करता त्या स्वयंसेवी संस्थांना दान करण्याचा कल गणेशभक्तांमध्ये वाढत आहे. रविवारी तब्बल २० हजार ७५ गणेशमूर्ती दान करण्यात आल्या, तर गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात २१ हजार २३८ मूर्तिदान करण्यात आल्या.