Ajit Pawar Speech ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा ऐतिहासिक सामना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचे पती आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कंबर कसली आहे. शरद पवार यांनी काल बारामती तालुक्याचा दौरा करत अजित पवारांवर निशाणा साधल्यानंतर आज अजित पवारांनी शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत काकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उमेदवारीबद्दल खळबळजनक गौप्यस्फोटही केला.
बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, "पुरंदरमध्ये विजय शिवतारे आता आपल्यासोबत आहेत. ते ११ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी सभा घेत आहेत. उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून शिवतारे यांना आलेले फोन त्यांनी मला दाखवले," असा दावा अजित पवारांनी केला. तसंच यावेळी ते भावुक होत म्हणाले की, "ते फोन नंबर बघून मला इतकं वाईट वाटलं की कोणत्या पातळीवर राजकारण सुरू आहे. त्यांनी ते फोन नंबर मला दाखवले, एकनाथ शिंदेंना दाखवले आणि देवेंद्र फडणवीसांनाही दाखवले. मी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, बाकी काही बघितलं नाही, त्यांच्याकडून माझ्या बाबतीत असं राजकारण सुरू आहे," असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे.
दादा जाधवरावांशी झालेल्या भेटीचा संदर्भ देत शरद पवारांवर टीका
अजित पवार यांनी आजच्या आपल्या भाषणात पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांच्यासोबत झालेल्या भेटीचा दाखला देत शरद पवारांवर निशाणा साधला. "मी दादा जाधवराव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी पवारसाहेबांना देव मानत होतो. मात्र त्यांनी एका निवडणुकीत हा बैल म्हातारा झाला आहे, आता याला बाजार दाखवा, असं म्हणत माझ्याविरोधात प्रचार केला. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. ज्या व्यक्तीला मी देव मानत होतो त्यांनी माझी तुलना बैलाशी केली. आता सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मी तालुक्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, असा शब्द मला दादा जाधवरावांनी दिला," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आजच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही जोरदार समाचार घेतला. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.