दौंडच्या पाण्याने घेतला भावडांचा बळी

By Admin | Updated: May 6, 2016 05:43 IST2016-05-06T05:43:04+5:302016-05-06T05:43:04+5:30

आईवडील कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर वडगाव येथील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. या दोघांचेही वाहत आलेले मृतदेह

A victim of rice used with Daund water | दौंडच्या पाण्याने घेतला भावडांचा बळी

दौंडच्या पाण्याने घेतला भावडांचा बळी

पुणे : आईवडील कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर वडगाव येथील कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. या दोघांचेही वाहत आलेले मृतदेह बी. टी. कवडे रस्त्यावरील कालव्यात आढळून आल्यानंतर गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बुधवारी खडकवासला धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात हे दोघेही वाहून गेले. या दोघांचेही मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले.
लक्ष्मी बाळू धांडे (वय ८), कृष्णा बाळू धांडे (वय ७, रा. दोघेही वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे मृत्यूमुखी पडलेल्या भावंडांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बी. टी. कवडे रस्त्यावरील शिवरकर बंगल्याजवळील कालव्यात एका मुलाचा मृतदेह वाहात आल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत हा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, तेथेच आणखी एका मुलीचा मृतदेह वाहात आला. हा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. दुपारपासूनच या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. दरम्यान शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना या मुलांबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोन मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे समजले.
लक्ष्मी आणि कृष्णा बुधवारी घरासमोर खेळत होते. खेळता खेळता हे दोघेही कालव्यामध्ये गेले. काही वेळाने त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अंधार पडल्यानंतर कुटुंबियांनी या दोघांची शोधाशोध सुरु केली. परंतु, त्यांचा काहीच ठावठिकाणा न लागल्यामुळे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आई आणि आजीने धाव घेतली. कायद्यानुसार १४ वर्षांखालील मुले हरवल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. आजी विमल शंकर पवार (वय ४५, रा. सांगवी) यांनी फिर्याद दिली होती. संपुर्ण रात्र मुलांच्या आठवणीमध्ये जागून काढलेल्या आई आणि आजीला गुरुवारी दोन्ही मुलांचे मृतदेह मिळाल्याचे समजताच धक्का बसला. या दोन मुलांच्या वडीलांचे काही वर्षांपुर्वी निधन झाले आहे.

Web Title: A victim of rice used with Daund water