अनधिकृत बांधकाम निर्मूलन कारवाईला वेग

By Admin | Updated: September 12, 2014 03:14 IST2014-09-12T03:14:14+5:302014-09-12T03:14:14+5:30

पुरेसे मनुष्यबळ आणि पोलीस बंदोबस्ताअभावी शहरात रडतखडत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निर्मूलनाच्या कारवाईस आता चांगलाच वेग मिळणार आहे.

Velocity of unauthorized construction eradication | अनधिकृत बांधकाम निर्मूलन कारवाईला वेग

अनधिकृत बांधकाम निर्मूलन कारवाईला वेग

पुणे : पुरेसे मनुष्यबळ आणि पोलीस बंदोबस्ताअभावी शहरात रडतखडत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निर्मूलनाच्या कारवाईस आता चांगलाच वेग मिळणार आहे. या कारवाईसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र पथके निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच, या कारवाईच्या खटल्यांसाठी स्वतंत्र वकिलांचीही नेमणूक महापालिकेकडून करण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम कारवाईबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच राज्यशासनानेही अशा कारवायांसाठी महापालिकेस स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्यास मान्यता दिल्याने आणि या विभागांसाठी नवीन मनुष्यबळ भरण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा नियमावलीस मान्यता दिल्याने, या कारवाईस आणखी वेग येणार आहे.
गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढलेली आहेत. या बांधकामांच्या प्रमाणात कारवाईसाठी महापालिकडे असलेले मनुष्यबळ आणि वेळेवर न मिळणारा बंदोबस्त यामुळे तुलनेने कमी आहे. तसेच, याबाबतची जबाबदारी निश्चित केली गेली असली तरी, या बांधकामांचे सर्वेक्षण कुणी करायचे, नोटीस कोणी द्यायची, आणि कारवाई कोणी करायची, यावरून महापालिका प्रशासनातच ताळमेळ नव्हता. त्यामुळे कारवाई प्रभावीपणे होत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन, या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच प्रभावी कारवाईसाठी नुकतीच महापालिका आयुक्त कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या बांधकाम, घरपाडी विभाग, तसेच अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात अनधिकृत बांधकाम निर्मूलनासाठी प्रत्येकी एक शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक तसेच एका उपअभियंत्याची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्या मदतीसाठी प्रत्येकी १५ ते २० पोलिसांचा एक गट कारवाईस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्या समवेत अशी बांधकामे शोधणारा एक गटही देण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Velocity of unauthorized construction eradication