प्रचारासाठी वाहनांची फौज सज्ज
By Admin | Updated: February 11, 2017 02:48 IST2017-02-11T02:48:59+5:302017-02-11T02:48:59+5:30
जिल्हा परिषदेचा प्रचार आता जोरात सुरू झाला असून, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची निवडणूक घाई चालू आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) प्रचारासाठी पक्ष चिन्ह असलेला रथ

प्रचारासाठी वाहनांची फौज सज्ज
पुणे : जिल्हा परिषदेचा प्रचार आता जोरात सुरू झाला असून, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची निवडणूक घाई चालू आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) प्रचारासाठी पक्ष चिन्ह असलेला रथ, चारचाकी व तीनचाकी अशा साडेचारशे वाहनांची परवानगी विविध उमेदवारांनी घेतली असून, त्यात पावणेतीनशे रिक्षा आहेत.
मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडे जेमतेम दहा दिवस शिल्लक आहेत. प्रभागाचा विस्तार पूर्वीपेक्षा अधिक असल्याने कमीत कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा, प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गाठीभेठी घेणे, कोपरा सभा, पत्रके, जाहीराती, सोशल मीडिया अशा विविध आयुधांचा वापर उमेदवारांकडून सुरूच आहे. याशिवाय प्रसिद्ध मराठी, हिंदी गीतांच्या संगीतावर उमेदवाराचे प्रचारगीत वाजविले जात आहे. याशिवाय उमेदवाराची ओळख सांगणारी वाहनेदेखील प्रभागातून फिरविली जात आहेत.
काही जणांनी वाहनात बदल करून रेल्वेचे स्वरूप देण्यात आले आहे, तर काही वाहनांवर कमळ, घड्याळ, धनुष्य अशी विविध पक्ष चिन्हे लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. रिक्षांवर ध्वनिक्षेपक व पक्ष चिन्हाचा बोर्ड लावून प्रचार सुरू आहे. तसेच उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या खासगी चारचाकी वाहनांवरूनही पक्षचिन्ह व उमेदवाराचे छायाचित्र लावून प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रचारासाठी वाहनांना परवानगी घेण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची परिवहन विभागात शुक्रवारी गर्दी उसळली होती. मात्र, अशा पद्धतीने प्रचार करण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कळविणे बंधनकारक असून, त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे शुक्रवारअखेर शहरातून ३९६ वाहनांना प्रचाराची परवानगी देण्यात आली होती. त्यात २७६ रिक्षांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेसाठी ११ चारचाकी वाहनांना परवानगी दिली आहे. बारामती परिवहन कार्यालयातून २० वाहनांना परवानगी दिली असून, ३० अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)