वितरकाकडे वाहन नोंदणीस सुरुवात, पुणे ठरले राज्यातील पहिले शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:37+5:302021-06-16T04:13:37+5:30
पुणे : सोमवारपासून राज्यात दुचाकी व चारचाकी नव्या वाहनांची नोंदणी वाहन वितरकांकडे करण्यास सुरुवात झाली. असे नोंदणी ...

वितरकाकडे वाहन नोंदणीस सुरुवात, पुणे ठरले राज्यातील पहिले शहर
पुणे : सोमवारपासून राज्यात दुचाकी व चारचाकी नव्या वाहनांची नोंदणी वाहन वितरकांकडे करण्यास सुरुवात झाली. असे नोंदणी करणारे पुणे शहर हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. रमेश वासवानी यांची दुचाकी तर, ऐश्वर्या भांगे यांची चारचाकी सर्वप्रथम नोंदवली गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या नव्या प्रणालीचे उद्घाटन केले.
राज्याच्या परिवहन विभागाने नव्या वाहन नोंदणीचे अधिकार वाहन वितरकांकडे देण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात सोमवारपासून झाली. रमेश वासवानी यांच्या वाहनाची नोंदणी झाल्यावर त्यांना लगेच एमएच १२ टीजे ७८१८ हा क्रमांक वितरकांकडून देण्यात आला.
याकरिता राष्ट्रीय सूचना केंद्राने आपल्या वाहन प्रणालीत आवश्यक ते बदल केला. नोंदणी करताना वाहनाच्या चेसीचा क्रमांक, वाहनाचा फोटोसह आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाइन सबमिट झाल्यावर लगेच क्रमांक मिळतो.
कोट : या नव्या प्रणालीमुळे वाहनधारकांचा खूप वेळ वाचणार आहे. त्यांना आरटीओ कार्यालयात यावे लागणार नाही. वाहनधारकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा.
-अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे