महामार्गावर वाहनांच्या रांगा
By Admin | Updated: July 21, 2014 03:57 IST2014-07-21T03:57:23+5:302014-07-21T03:57:23+5:30
येथे लाखो पर्यटकांनी गर्दी केल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर किमान पाच ते सहा किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या

महामार्गावर वाहनांच्या रांगा
लोणावळा : येथे लाखो पर्यटकांनी गर्दी केल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर किमान पाच ते सहा किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पर्यटकांना अर्ध्या रस्त्यामधूनच परतीचा मार्ग धरावा लागला, तर लोणावळेकरांना या कोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला़
पावसाळी पर्यटनासाठी व भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटकांनी रविवारी लोणावळ्याकडे धाव घेतली. शहरात येणारे सर्व रस्ते वाहतूक कोंडीने बंद पडले होते़ पुण्याकडून येताना वलवण गावाकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत, तर मुंबईकडून येणाऱ्या मार्गावर दर्ग्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने तासन्तास वाहतूककोंडीत अडकलेल्या पर्यटकांनी अर्ध्या रस्त्यामधूनच माघारी परतण्याचा पर्याय स्वीकाराला़ भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर तीच स्थिती होती़ सुमारे पाच ते सहा किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्याने सकाळी निघालेली वाहने दुपारनंतर धरण परिसरात पोहचली़ तेथेदेखील पर्यटकांच्या तुफ ान गर्दीमुळे पर्यटकांना वर्षाविहाराचा आनंद घेता न आल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला़ टायगर पॉइंट, गिधाड तलाव, राजमाची गार्डन, टायगर व्हॅली, सनसेट पॉइंट, सहारा पूल धबधबा या सर्वच ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाल्याचे लोणावळेकरांनी अनुभवले़ प्रचंड वाहतूककोंडीने २ दिवसांपासून लोणावळेकरांचे जनजीवन कोलमडले आहे़ यातच पावसाची संततधार सुरू असल्याने वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ आले होते़ वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाने दर शनिवारी व रविवारी अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)